पिंपरीतील ‘आजारी’ एचए कंपनीत तयार करण्यात येणारी कीटकनाशके व औषधे राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरेदी करावीत, या दृष्टीने कृषि व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न सुरू केले असून तशी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत. यापूर्वी, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पालिका रुग्णालयांसाठी एचए कंपनीतून औषधे खरेदी करण्याची भूमिका घेतली होती.
पिंपरीत एका कार्यक्रमासाठी विखे पाटील आले असता विरोधी पक्षनेते कैलास कदम यांनी एचए कंपनीच्या सद्य:स्थितीची माहिती त्यांना दिली व शासनाने औषधे खरेदी करून कंपनीला आधार द्यावा, अशी विनंती केली होती. त्यानंतरनुसार, कंपनीचे एक शिष्टमंडळ विखे यांना मुंबईत भेटले. तेव्हा कंपनीकडून तयार होणारे बुरशीनाशक तसेच जीवनाशक उत्पादन खरेदी करण्यास त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. कृषी विभागाकडून रीतसर प्रस्ताव तयार करण्यात येईल व ८ एप्रिलला पुण्यात विनय आवटे यांच्या कार्यालयात बैठक होईल, असे विखे यांनी स्पष्ट केले. या वेळी कैलास कदम, नगरसेवक सद्गुरू कदम, एचए कंपनीचे उपव्यवस्थापक पी. के. सेन, कामगार प्रतिनिधी शरद पाटील, प्रवीण रूपनर आदी उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून एचए कंपनी आर्थिक संकटात असल्याने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण आहे. महापालिकेने कंपनीला आधार द्यावा, त्यासाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कंपनीने तयार केलेली औषधे वापरावीत, अशी मागणी कदम बंधूंनी आयुक्त डॉ. परदेशी यांच्याकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दीड लाखांची औषधे नुकतीच खरेदी करण्यात आली. पालिकेपाठोपाठ राज्यशासनानेही सकारात्मक भूमिका घेतल्याने कामगार वर्गात समाधानाचे वातावरण दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After pimpri corp now govt also role as a aadhar for h a
Show comments