लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: ‘मी कोयता भाई आहे, तुला माहिती नाही का? तू माझा फोन का उचलला नाही, आता तुला संपवतो’ असे म्हणत पाच जणांच्या टोळक्याने एकाला कोयत्याने मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास संत तुकारामनगर येथे घडली.

या प्रकरणी आशिष रामबाबू पाल (रा.पिंपरीगाव), सागर ज्ञानदेव ढावरे (वय २०, रा. मिलिंदनगर, पिंपरी) दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजिंक्य अरुण टाकळकर (वय २१, रा.मोशी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… घरकाम करणाऱ्या महिलेसोबत अश्लील चाळे आले अंगलट

खराळवाडीतील यात्रा संपल्यानंतर अजिंक्य हा घरी जात होता. त्यावेळी आरोपी आशिष तिथे आला. ‘बोलके कुछ होता नही’ असे म्हणत त्याने अजिंक्य याच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, तो चुकविण्यासाठी हात वर केला असता हाताच्या पोटरीवर वार लागला. अजिंक्य घाबरून पळून जात असताना खाली पडला. त्यानंतर आरोपी आशिष आणि त्याच्या साथीदारांनी हाताने, लाथा बुक्यांनी मारहाण केली.

हेही वाचा… आंध्र प्रदेशातील सूत गिरणीत गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील उद्योजकाची एक कोटी रुपयांची फसवणूक

अजिंक्य याने ‘काय झाले तुम्ही मला का मारत आहे’ असे विचारले असता आरोपी आशिष याने ‘मी कोयता भाई आहे, तुला माहिती नाही का? मी तुला कॉल केले होते, तू माझा फोन का घेतला नाही, आता तुला संपवतो’ असे म्हणत हातातील कोयत्याने अजिंक्य याच्या पाठीवर, मानेवर वार केले. इतर आरोपींनीही कोयत्याने मांडीवर वार केले. त्यानंतर अजिंक्य आरोपींपासून वाचण्यासाठी घरात घुसला असता आरोपींनी कुंडी मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. आरोपी आशिष याने मोठ्याने ओरडून तू घरातून बाहेर निघ, तुला आज जीवंत सोडणार नाही असा आरडाओरडा करत कोयते दाखवून दहशत निर्माण केली.

Story img Loader