पुणे : शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने शहरातील डेक्कन परिसरातील झाडांना बोलके केले आहे. विद्यार्थी आणि समाजाला वनस्पतींबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अंतर्गत झाडांवर चिकटवलेले क्यूआर कोड मोबाइलद्वारे स्कॅन केल्यावर वनस्पतींची माहिती वाचता, ऐकता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या संकल्पनेतून झाडांना बोलके करण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात वनस्पतीशास्त्र विभागातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डेक्कन परिसरातील जंगली महाराज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता, आपटे रस्ता, घोले रस्ता येथील विविध वनस्पतींच्या प्रजातींचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ४५ पेक्षा जास्त प्रजातींची एकूण ७०० पेक्षा जास्त झाडे आढळली. दुसऱ्या टप्प्यात या वनस्पतींना बोलके करण्यासाठी वनस्पतींचे शास्त्रीय नाव, प्रचलित नाव, छायाचित्र अशी माहिती संकलित करून ती श्राव्य स्वरुपात संकेतस्थळावर आणण्यात आली. त्यानंतर ही माहिती क्यूआर कोडला जोडण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात हे क्यूआर कोड झाडांची कोणतीही हानी होऊ न देता झाडांवर चिकवटण्यात आले. या उपक्रमात वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीता पाटील, डॉ. राजकुमार बारमुख, डॉ. यू. आर. वायसे, डॉ. आरती गोग्गी यांच्यासह ओम सोनटक्के, राम चितळे, सुरेश तेले, पार्थ झेंडे, अंजली धोटे, कोमल बेनगुडे, जान्हवी वाघोलीकर, सायली सोनवणे, शिवानी मोरे, श्रावणी यादव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा – पुणे : वाड्यांच्या जागेवर झोपडपट्टी दाखवून बांधण्यात येणाऱ्या इमारतींना स्थगिती? महापालिकेचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले, की वनस्पतींचे आपल्या आणि समाज जीवनातील अविभाज्य स्थान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने झाडांना बोलके करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. सुरुवातीला एकूण २७० झाडांना क्यूआर कोड चिकटवण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात संचेती रुग्णालयापासून छत्रपती संभाजी पूल, कृषी महाविद्यालय अशा परिसरातील झाडांची माहिती तयार करून त्यांचे क्यूआर कोड झाडांना चिकटवले जाणार आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने डॉ. तारा भवाळकर यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार

येत्या काळात उपक्रमाचा विस्तार

या पूर्वी २०१७ मध्ये झाडांना पाट्या लावण्याचा उपक्रम केला होता. त्यावेळी पाचशे झाडांची माहिती देणाऱ्या पाट्या लावल्या होत्या. मात्र आता पर्यावरणपूरक पद्धतीने, तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतींबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे येत्या काळात या उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना आहे. त्यासाठी महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. अन्य शाळा, महाविद्यालयांना अशा प्रकारचा उपक्रम राबवायचा असल्यास त्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करण्याची तयारी आहे, असेही डॉ. झुंजाराव यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After scanning the qr code pasted on the trees in the deccan region information about the plants can be read and heard pune print news ccp 14 ssb
Show comments