पिंपरी : एक लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्तांवर लाखबंद (सील) कारवाईनंतर आता थकबाकीदारांच्या दरवाजासमोर बॅण्डवादन केले जाणार आहे. खासगी संस्था, शाळा व महाविद्यालये, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औद्योगिक कारखाने, शो रूम, मंगल कार्यालये, बँका, मॉल, चित्रपटगृहे अशा बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांसमोर बॅण्डवादन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर संकलन विभाग गेल्या वर्षापेक्षा उत्पन्नात यंदा मागे आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी बैठक घेत शहरातील बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार थकबाकीदार मालमत्ताधारकांमध्ये जनजागृती, संदेशाच्या माध्यमातून कराचा भरणा करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मालमत्ता लाखबंदची कारवाई केली जात आहे. कर संकलन विभागाच्या पथकांनी आतापर्यंत ४१८ मालमत्ता लाखबंद केल्या आहेत. त्यांच्याकडे ११ कोटी ३७ लाख २३ हजार १९८ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. मालमत्ता जप्ती कारवाईच्या वेळेस १ हजार ५११ मालमत्तांनी एकूण २६ कोटी ९२ लाख ७३ हजार ७४९ रुपयांचा भरणा केला आहे.

हेही वाचा…माजी मंत्र्यांच्या हट्टामुळे महापालिकेचा सव्वा कोटी खर्चाचा घाट?

कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व कर आकारणीची कार्यवाही करण्यासाठी स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या मालमत्तांपैकी ६४ हजार २६० मालमत्तांना नव्याने कर आकारणी करण्यात आली आहे.

गृहनिर्माण साेसायटीच्या अध्यक्षांकडे यादी

मालमत्ता सर्वेक्षणामध्ये नव्याने आकारणी झालेल्या ६९० गृहनिर्माण सोसायट्यांमधील ५६ हजार २३२ मालमत्तांना मालमत्ता कराची देयके बजाविण्यात आली आहेत. ६५१ सोसायट्यांमधील ३६ हजार ९८० मालमत्ताधारकांकडे ६९ काेटी ५६ लाख रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे ६५१ सोसायट्यांच्या अध्यक्षांना सोसायटीमधील थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची यादी देण्यात येणार आहे. या थकबाकीदारांना कर भरण्याचे आवाहन अध्यक्षांनी करावे, असे पत्रही देण्यात येणार आहे.

हेही वाचा…शिवसेना कोणाची ? भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांची स्पष्ट भूमिका म्हणाले…!

थकबाकी असलेल्या हाॅटेल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक कारखाने, खासगी रुग्णालये, शाळा व महाविद्यालये या बिगरनिवासी मालमत्ता लाखबंद करण्यात येणार आहेत. या मालमत्तांसमोर बॅण्ड वाजविण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After sealing properties with over one lakh rupees in arrears bandhing will be done at defaulters doors pune print news ggy 03 sud 02