पुणे : पुणे विमानतळावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) विमानतळावर उपलब्ध नव्हता. याबाबत हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली आणि विमानतळावर एईडी बसविण्यात आला.
पुणे विमानतळावरील दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे ३० हजार आहे. कोणत्याही प्रवाशाला आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी एईडीची आवश्यकता भासते. प्रामुख्याने एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला तर सुरुवातीच्या टप्प्यात एईडीमुळे त्याचा जीव वाचू शकतो. परंतु, पुणे विमानतळावर एईडीच उपलब्ध नव्हता. ही बाब वंडेकर यांनी पुणे विमानतळ व्यवस्थापनाच्या फेब्रुवारीमध्ये निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर कार्यवाही न झाल्याने त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा सुरू केला. अखेर काहीच घडत नसल्याने त्यांनी २ सप्टेंबरला पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली.
हेही वाचा – पुणे : दीपबंगला चौकात मोटारीवर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे उत्तर वंडेकर यांना ४ ऑक्टोबरला मिळाले. अत्यावश्यक आरोग्य सुविधा प्रवाशांना मिळाव्यात यासाठी विमानतळावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी नव्याने निविदा काढण्यात आल्याचे मंत्रालयाकडून कळविण्यात आले. या कक्षात पाच एईडी बसविण्यात येणार असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले. याचबरोबर तातडीने एक एईडी विमानतळावर उपलब्ध करून दिल्याचेही सांगण्यात आले.
एखाद्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला तर तिथून तीन मिनिटांपेक्षा कमी अंतरात एईडी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मुंबई विमानतळावर १२० एईडी आहेत. पुणे विमानतळावर एईडी नसल्याची बाब मी निदर्शनास आणून दिली होती. अखेर एईडी उपलब्ध झाल्याने प्रवाशांना आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी फायदा होणार आहे. – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ