पिंपरी: तीर्थक्षेत्र देहू येथील ५० एकर गायरान जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देण्यासाठी देहूकरांनी तीव्र विरोध केल्यानंतर पोलिसांनी आता मोशीतील गायरान जागेची चाचपणी सुरु केली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ४ नोव्हेंबर रोजी मोशीतील जागेची पाहणी केली.
पोलीस सहआयुक्त संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, तहसीलदार अर्चना निकम, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा… दिवाळीत खाद्यतेल स्वस्त; गृहिणींना दिलासा
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती २०१८ मध्ये करण्यात आली. आयुक्तालयाचे कामकाज २०१८ मध्ये सुरू झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून अद्याप आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळलेली नाही. देहूगाव गायरान येथील ५० एकर जागा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी देण्याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, या जागेला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ही जागा उपलब्ध होण्यास विलंब आणि अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे मोशी येथील गायरान जागेत पोलीस आयुक्तालय उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. काही पोलीस ठाण्यांचे विभाजनही करण्यात येणार आहे. पोलीस संचलन मैदान, अन्य कामकाज एकाच आणि मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येईल. मध्यवर्ती ठिकाण म्हणून मोशीतील गायरान जमिनीवर पोलीस आयुक्तालयाची भव्य इमारत उभारावी. पोलीस आयुक्तांनी जागेची पाहणी केली. यासाठी आता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.