पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि पक्ष म्हणून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही या यशामध्ये फार रममाण न राहता भाजपने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपने सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीची महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कुठलीही हालचाल दिसत नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि मतदान यंत्रांवरील आक्षेप यांमध्येच आघाडी अडकली असल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. या विजयामुळे शहर भाजपचा आत्मविश्वासही उंचावला आहे. त्यादृष्टीने येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महापालिका निवडणुकीची तयारी भाजपकडून करण्यात आली असून महापालिकेवर भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा – पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, महेश पुंडे, सुशील मेंगडे यांच्यासह माजी नगरसेवक शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी ५० हजार सदस्य करण्याचा आणि प्रत्येक प्रभागात कमीत कमी १० हजार सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवून शाश्वत विकासाला प्राधान्य दिल्याचे निवडणूक निकालावरून दिसत आहे. भाजपकडे येणाऱ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून शहरामध्येही सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणार आहे, असे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
भाजपने एकीकडे सदस्य नोंदणी मोहीम राबविण्याचे ठरविले आहे, तर दुसरीकडे आघाडीची महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कुठलीही हालचाल नसल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीकडून मतदान यंत्रांवर आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यातून मतदान यंत्रांविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचे आघाडीकडून निश्चित करण्यात आले आहे.