पुणे: ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रेल्वेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. पुणे-दौंड लोहमार्गाच्या सुरक्षेचा आढावा मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश ललवानी यांनी घेतला. सिग्नल प्रणाली आणि ओव्हरहेड विद्युत उपकरणांची त्यांनी पाहणी केली.
या पाहणीवेळी ललवानी यांच्यासोबत पुणे विभागीय व्यवस्थापिका इंदू दुबे, मुख्य परियोजना व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ललवानी यांनी लोणी रेल्वे स्थानकातील पॅनेल रूम, रिले रूमची तपासणी केली. तेथे नियुक्त असलेले ट्रॅकमन, पॉइंट्समन, स्थानक व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.
आणखी वाचा-पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकांमध्ये ‘दादा’ कोण? चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अजित पवारांचे आव्हान
लोणीतील मालवाहतूक सुविधेची तपासणीही ललवानी यांनी केली. दरमहा येथून ८५ मालगाड्या भरून जातात. या सुविधेचा विस्तार करण्यासाठी भूसंपादन करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या सुविधेचा विस्तार झाल्यानंतर सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ४२ वॅगनच्या मालगाड्यांची येथून विनाविलंब वाहतूक सुरू होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.
पाटस स्थानकावर पादचारी पूल
पाटस रेल्वे स्थानकाची सरव्यवस्थापक ललवानी यांनी तपासणी केली. त्या वेळी त्यांनी स्थानकाच्या अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली. पाटसमधील रेल्वे प्रवासी संघटनांनी पाटस स्थानकावर पादचारी पूल उभारण्याची मागणी ललवानी यांच्याकडे केली. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.