मधुमेह आणि लठ्ठपणाच्या एकत्रित रुग्णांची संख्या देशात वाढत आहे. उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार, मूत्रपिंड आणि यकृताचे आजार, अनेक प्रकारचे कर्करोग, वंध्यत्व, थकवा, नैराश्य यांसारखे अनेक आजार त्या बरोबरीने येतात. करोना महासाथीमुळे चयापचयाच्या म्हणजेच लठ्ठपणाच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. लहान किंवा किशोरवयीन मुलेही लठ्ठपणाच्या तावडीतून सुटलेली नाहीत, अशी माहिती प्रख्यात बेरियाट्रिक शल्यविशारद डॉ. जयश्री तोडकर यांनी गुरुवारी दिली.
हेही वाचा >>>ठाणे जिल्हा बनतोय बिबट्याचे अधिवास क्षेत्र?;नैसर्गिक परिस्थितीची अनुकुलता
चयापचयाशी संबंधित आजारांवर उपचारांसाठी एका विशेष केंद्राची सुरुवात केईएम रुग्णालयात करण्यात आली आहे. डॉ. जयश्री तोडकर या केंद्राचे नेतृत्व करणार आहेत. चयापचयाशी निगडित आजार असलेल्या ८० टक्के रुग्णांना पोटाचा घेर असतो. ६० टक्के रुग्ण एकंदरच लठ्ठ असतात. लवकर निदान आणि उपचार यांच्या मदतीने लठ्ठपणाचे दूरगामी परिणाम टाळणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक जनजागृती करण्याचे काम या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>ठाणे: कशेळी खाडी पूलावरील मातीचे ढिगारे उचलेले; रस्त्यावरील धूळप्रदूषण मात्र कायम
डॉ. तोडकर म्हणाल्या, की या केंद्रात आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर, शल्यविशारद, समन्वयक, समुपदेशक हे एका छताखाली काम करणार आहेत. त्यामुळेच उपचार करताना फक्त वजन, साखरेची पातळी, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब अशा उपचारांदरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित न करता सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज आहे, याकडेही डॉ. तोडकर यांनी लक्ष वेधले.