पुणे: रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली आहे. ग्राहकांकडून दोन हजारांच्या नोटांचा भडिमार होत असल्याने कमी मूल्याच्या नोटांची टंचाई निर्माण झाली आहे. याचवेळी आता काही बँकांनी पेट्रोल पंपचालकांची दैनंदिन रोकड स्वीकारताना नवे नियम लागू केले आहेत. यामुळे त्यांची कोंडी होऊ लागली आहे.

रिझ्रर्व्ह बँकेने वितरणातून दोन हजारांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय १९ मे रोजी घेतला. तेव्हापासून पेट्रोल पंपांवर ग्राहकांकडून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढले आहे. नेहमीपेक्षा हे प्रमाण दुप्पट असल्याचे पेट्रोल पंपचालकांचे म्हणणे आहे. शंभर आणि दोनशे रुपयांचे पेट्रोल भरून ग्राहक दोन हजारांची नोट देऊन सुटे मागत आहेत. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपचालकांनी दोन हजारांचे पेट्रोल भरल्यास दोन हजारांची नोट स्वीकारली जाईल, असे फलक लावले आहेत.

आणखी वाचा-नोटबदलीच्या पहिल्याच दिवशी पुण्यात दिसले ‘असे’ चित्र

या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, पेट्रोल पंपांवर कमी मूल्याच्या नोटांची समस्या असताना आता बँकांनीही आम्हाला नवे नियम लागू केले आहेत. काही बँका पेट्रोल पंपावरील दैनंदिन रोकड स्वीकारताना वेगळा अर्ज लिहून घेत आहेत. याचबरोबर ही रोकड जमा करणाऱ्यांची ‘केवायसी’ कागदपत्रे मागितली जात आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनेच याबाबत सर्व बँकांसाठी नियमावली जाहीर करून पंपचालकांची समस्या सोडवावी. यातून सध्या निर्माण झालेला गोंधळही कमी होईल.

ग्राहकांकडून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर कमी मूल्याच्या नोटांची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे काही पंपचालक दोन हजारांच्या नोटा नाकारत आहेत. -ध्रुव रूपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणे</strong>