राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता नवीन राज्यपाल मिळणार असून, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषकरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये राज्यपाल कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर …” कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारेंचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र!

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, “भाजपाने महाराष्ट्राची जेवढी बदनामी राज्यपालांकडून करून घ्यायची होती, ते करून घेण्याचं काम केलं. ते काम पूर्ण झालं असं भाजपाला वाटत असेल, म्हणून आता भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्राबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं जे वक्तव्य त्यांनी केलं होतं. ते नाना पटोले आणि महाराष्ट्रातील जनता कधीही विसरू शकणार नाही. असा पक्षपाती राज्यपाल भाजपाने महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी मुद्दाम इथे बसवून ठेवला होता. तसेच, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जो काही सर्वे आता येतोय, महाविकास आघाडीचे ३८ खासदार आता महाराष्ट्रात निवडून येणार आहेत. त्यामध्ये मोठा वाटा राज्यपालांचाही आहे. हे लक्षात आल्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची खुर्ची कायम राहिली पाहिजे, मी सत्तेत राहिलो पाहिजे यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न आहे.”

जो बुंद से गई वो हौदेसे वापस नही आती –

याचबरोबर “पण या निमित्त महाराष्ट्राच्या जनतेचा दबाव आणि स्वत:ला महाशक्ती समजणारं नरेंद्र मोदींचं सरकार यांनी महापुरुषांच्या विचाराला महापुरुषांना व महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो निर्णय़ झाला, त्याचा विरोध महाराष्ट्राच्या जनतेने केला. तसंच आता खऱ्या अर्थाने भाजपाला सत्तेवरून खाली उतरवणं गरजेचं आहे. आज महागाई कमी करायची असेल, युवकांची बेरोजगारी संपवायची असेल, शेतकऱ्यांना न्याय पाहिजे असेल तर भाजपाला सत्तेतून काढावं लागणार आहे. हा जेव्हा संदेश जाईल तर मग नरेंद्र मोदींचं सरकार शेवटच्या काळात तरी या देशाच्या गरिबांना, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी आणि महागाई कमी करण्यासाठी काही निर्णय़ करेल. कारण आज आपण पाहतोय की ते अदाणीचे चौकीदार बनले आहेत. पण देशाच्या जनतेची चौकीदारी ते करत नाहीत, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून आता हा जो बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, त्या बदलाचा कुठलाही परिणाम होणार नाही. हमारे यहाँ एक कहावत आहे, जो बुंद से गई वो हौदेसे वापस नही आती. भाजपाने ज्या पद्धतीने महाराष्ट्राला अपमानित करण्याचं काम राज्यापला भगतसिंह कोश्यारींच्यावतीने केलं, निश्चितपणे भाजपाला याचे परिणाम भोगावे लागतील.” असंही नाना पटोले यांनी म्हटलं.

नवीन राज्यपालांकडून काँग्रेसच्या काय अपेक्षा? –

याशिवाय, “राज्यपालाचं एक दायित्व असतं, ते राज्याच्या जनतेचे राज्यपाल असतात. ते प्रमुख असतात त्याचं एक वेगळं संविधानिक व्यवस्थेत महत्त्व आहे. त्यांनी पक्षपाती नसावं, सरकारने चुकीचं केलं तर त्यांचे कार उपटण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. विरोधकांकडून काही चुकीचं होत असेल तर त्यांचेही कान उपटण्याचे अधिकार राज्यपालांना आहे. परंतु जनतेचे ते प्रमुख असतात, जनतेला न्याय मिळावा, सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत. अशा पद्धतीचा त्यांचा अधिकार असतो. आता जे नवीन राज्यपाल आले आहेत रमेश बैस ते माझे मित्र आहेत, माझ्याबरोबर खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढावा, महाराष्ट्राचा पुरोगामी विचाराचा संदेश संपूर्ण देशात नाहीतर जगात पोहचावा आणि महाराष्ट्राच्या विकासाची भरभराट व्हावी, अशा अपेक्षा नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून आमच्या आहेत.” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

हकालपट्टी केली नाही, त्यांचा राजीनामा मंजूर केला –

“ज्यावेळी हे सगळं पाप सुरू होतं, राज्यपाल भवन हे भाजपा भवन झालं होतं. आम्ही सातत्याने सांगत होतो की राज्यपाल भवन हे कुठल्याही पक्षाचं कार्यालय होऊ शकत नाही. सातत्याने आम्ही सांगत होतो की यांची हकालपट्टी करा. असं आम्ही म्हणत होतो परंतु त्यांनी हकालपट्टी केली नाही, त्यांचा राजीनामा मंजूर केला म्हणजे त्यांचा सन्मान केला. आता सन्मान करणे हे भाजपाला किती महागात पडेल, महाराष्ट्राची जनता या महाराष्ट्राच्या अपमानाचा बदला कसा घेईल हे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे.” असं म्हणत नाना पटोले यांनी सूचक इशारा दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the resignation of governor bhagat singh koshyari was accepted congress state president nana patole criticized bjp msr