पुणे : मोबाइलवरील मालिका बंद केल्याने अल्पवयीनाने आईवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना धनकवडी भागात घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत मुलगा मोबाइलवरील मालिका पाहत होता. त्यावेळी आईने जास्त वेळ मोबाइलवरील मालिका पाहू नको, असे सांगितले. त्यानंतर तो मालिका पाहत होता. त्यामुळे आईने त्याच्या हातातून मोबाइल संच हिसकावून घेतला आणि मालिका बंद केली. आईने मोबाइल संच हिसकावून घेतल्याने मुलगा चिडला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातील लाकडी फ्रेम फोडली, तसेच कात्रीने आईवर वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घरातील खिडकीच्या काचा फोडल्या. घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार जाधव तपास करत आहेत.

हे ही वाचा…आचारसंहिता सुरू मात्र शहरातील राजकीय फ्लेक्सवर कारवाईस टाळाटाळ, काय आहे कारण !

अल्पवयीनांना गुन्हेगारीचे आकर्षण

सातत्याने मोबाइल पाहणे, मोबाइलवरील मारहाणीचे चित्रपट, हिंसक घटनांच्या चित्रफिती, गुन्हेगारांच्या चित्रफिती पाहून अनेक अल्पवयीन गुन्हेगारीकडे वळतात. गुन्हेगारीविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे मुले वाईट गोष्टींकडे वळतात. अनेक गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन सामील होतात. अल्पवयीनांचा गुन्हेगारीकडे वाढणारा कल चिंतेची बाब आहे. मुलांमधील गुन्हेगारी रोखणे, तसेच त्यांना गुन्हेगारी मार्गावर न जाऊ देण्यासाठी पोलिसांकडून समुपदेशन करण्यात येत आहे. गुन्हेगारीकडे वळणारी मुले, त्यांच्या पालकांचे स्वयंसेवी संस्थेतील तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After turning off serial on mobile minor tried to stab mother with scissors pune print news rbk 25 sud 02