पावलस मुगुटमल
नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये बहुतांश वेळेला झाकोळलेली थंडी आणि दिवसाचे कमाल तापमान वाढून निर्माण झालेल्या उन्हाच्या चटक्याचा परिणाम राज्यातील जलसाठय़ावर झाला आहे. यंदा ऑक्टोबरच्या अखेपर्यंत लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये विक्रमी सुमारे ९७ टक्क्यांपर्यंत पाणी जमा होऊनही दोनच महिन्यांत त्यात १२ टक्क्यांनी घट झाली आहे.
जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या चार महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेत २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. याच काळात राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला होता. अनेक धरणांतून विसर्गही करण्यात आला. महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरपासून पावसाने परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर २२ ऑक्टोबपर्यंत आणि त्यापूर्वीही राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागांत शेतीचे नुकसान झाले. मात्र, दुसऱ्या बाजूला धरणे काठोकाठ भरली.
१ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक आणि विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यातून सर्वच मोठे प्रकल्प पूर्णपणे भरले. कोयना, उजनी, जायकवाडी आदींसारखे अवाढव्य प्रकल्पही पूर्णपणे भरल्याने विसर्ग करावा लागला. ऑक्टोबरअखेपर्यंत धरणांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत विक्रमी पाणीसाठा जमा झाला होता. नाशिक विभागात मोठय़ा पावसाची नोंद झाल्याने या विभागातील धरणांमध्ये तब्बल ९९.५३ टक्के पाणी होते. त्यापाठोपाठ अमरावती विभागातील प्रकल्पांत ९८.६८ टक्के, औरंगाबाद विभागात ९७.५७ टक्के, पुणे विभागात ९७.३५ टक्के, कोकण विभागात ९६.५२ आणि नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ८९.२२ टक्के पाणीसाठा होता.
यंदा हिवाळय़ाच्या हंगामात पावसाळी स्थितीमुळे प्रामुख्याने डिसेंबरमध्ये आणि नोव्हेंबरमधील काही दिवस थंडी झाकोळली. दिवसा निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका वाढला. या दोन महिन्यांत राज्यात सर्वत्र बहुतांश वेळेला दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिला. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला. परिणामी धरणांतील पाणीसाठय़ावर त्याचा परिणाम झाला असून, ऐन हिवाळय़ात दोन महिन्यांत १० ते १२ टक्क्यांनी पाणीसाठा घटला आहे.
मोठय़ा प्रकल्पांतील पाणीसाठा
विभाग १ नोव्हेंबर सद्य:स्थिती
अमरावती ९८.६८ टक्के ८३.१५ टक्के
औरंगाबाद ९७.६७ टक्के ८८.०३ टक्के
कोकण ९६.३३ टक्के ८३.४३ टक्के
नागपूर ८९.३३ टक्के ७७.७५ टक्के
नाशिक ९९.०५ टक्के ९४.०२ टक्के
पुणे ९७.०३ टक्के ८५.४४ टक्के
एकूण ९६.७२ टक्के ८५.७४ टक्के