पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या शहरी दळणवळण विभागाला अखेर दोन महिन्यांनी कामकाज दिले आहे. चौकांमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यकतेनुसार उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नद्यांवरील पूल, सायकल, पादचारी मार्ग, वाहतुकीशी संबंधित आरक्षणे, वाहनतळे विकसित करण्याचे कामकाज विभागाकडे सोपविले आहे.

शहरातील वाढती वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी नव्याने शहरी दळणवळण विभाग दाेन महिन्यांपूर्वी सुरू केला. मात्र, दाेन महिने या विभागाला काम, जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे काय काम करावे, असा प्रश्न विभागासमाेर पडला हाेता. अखेर राज्यातील विविध शहरांतील दळणवळण विभागाच्या कामकाजाची माहिती घेऊन महापालिकेने कामकाज निश्चित केले आहे. शहरातील मुख्य रस्ते, नदी, नाल्यावरील पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, समतल विलगक, पादचारी पूल, सायकल मार्ग, बीआरटी, मेट्राे प्रकल्प, मेट्राे निवाे प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक संबंधित नियाेजन, महापालिकेतील विकास आराखड्यातील मुख्य रस्ते बांधणे, वाहतुकीचे नियमन व अंमलबजावणी करणे, सार्वजनिक बस सेवा, रिक्षा, मेट्राे, ट्राम याविषयी संबंधित संस्थेशी समन्वय साधून नियमन व सुधारणा करणे, महापालिकेची वाहने हरित इंधनावर रूपांतरीत करण्याची जबाबदारी दिली आहे. विकास आराखड्यातील ३० मीटरपुढील रस्ते विकसित करून त्यांचे देखभाल दुरुस्तीसह सर्व कामे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

रस्त्यांचे लेखापरीक्षण

शहरातील रस्त्यांचे सहा महिन्याला, वर्षाला लेखापरीक्षण करणे, अपघातजन्य ठिकाणे (ब्लॅकस्पाॅट) कमी करण्यासाठी उपाययाेजना तसेच वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी मालवाहतूक मार्गाचे नियाेजन, ट्रक टर्मिनल जागा, खासगी बस थांबे, रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्त्यांच्या पुनर्रचनेची कामे या विभागामार्फत करण्यात येणार आहेत.

बालवाहतूक सुरक्षा उद्यानाची उभारणी

नवीन पिढीतील वाहन लकांना वाहतूक नियमांची जाणीव व्हावी, यासाठी बालवाहतूक सुरक्षा उद्यानाची उभारणी केली जाणार आहे. शहरातील विकास आराखड्यातील वाहनतळे विकसित करणे, पार्किंगस्थळे निश्चित करणे, पे अँण्ड पार्किंग धाेरणाची अंमलबजावणी, विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानके निर्माण करण्यात येणार आहेत.

शहरातील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी शहरी दळणवळण विभाग काम करेल. विभागाची कार्यकक्षा निश्चित केली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक काेंडी सुटण्यास मदत हाेईल. शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका