करोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (३१ ऑगस्ट) पुण्यनगरीत वाजत-गाजत गणरायाचे आमगन होणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांतील कलाकारांचे मधूर वादन अशा जल्लोषात छोटेखानी मिरवणूक काढून मानाच्या गणपतींची बुधवारी मुहूर्तावर पूजा करून विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त असे सारेच गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकमान्यांच्या प्रेरणातून मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. गणेश चतुर्थीला बुधवारी (३१ ऑगस्ट) मानाच्या गणपतींची मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच गणेशभक्त उत्सुक झाले आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठेमध्ये चैतन्याची लहर पसरली आहे. 

मानाचा पहिला श्री कसबा गणपती  –

  • परंपरेप्रमाणे मिरवणूक काढून गणरायाची मूर्ती चांदीच्या पालखीतून उत्सव मांडवात 
  • मिरवणुकीत सनई चौघडा, बँड, तीन ढोलताशा पथकांचा समावेश. 
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हुतात्मा राजगुरू यांचे नातू सत्यशील आणि धैर्यशील राजगुरू यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी –

  • चांदीच्या पालखीतून होणार श्रींच्या मूर्तीचे आगमन
  • नगारावादन, बँड, ढोलताशा पथक, शंख पथक, गोंधळी संबळ पथकाचा मिरवणुकीत समावेश
  • कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता प्रतिष्ठापना

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळ –

  • परंपरेप्रमाणे फुलांची आकर्षक सजावट असलेल्या रथातून गणरायाची मूर्ती उत्सव मंडपात 
  • मिरवणुकीत नगरावादन आणि पाच ढोल-ताशा पथकांचा समावेश. 
  • उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी प्रतिष्ठापना

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ –

  • परंपरेप्रमाणे मिरवणूक काढून श्रींच्या मूर्तीचे होणार आगमन
  • मिरवणुकीत तीन ढोल-ताशा पथकांचा समावेश
  • उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता होणार गणरायाची प्रतिष्ठापना

मानाचा पाचवा केसरी गणेशोत्सव –

  • पालखीतून गणरायाच्या मूर्तीचे केसरीवाड्यातील उत्सव मंडपात आमगन
  • मिरवणुकीत दोन ढोल-ताशा पथकांचा समावेश
  • डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. प्रणति टिळक, डॉ. गीताली टिळक-मोने यांच्या हस्ते सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार प्राणप्रतिष्ठा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती  –

  • गरूड रथातून श्रींच्या मूर्तीचे उत्सव मंडपात आगमन होणार; मिरवणुकीत चौघडा, सनई, बँड, ढोलताशा पथकांचा समावेश
  • गिरनार (गुजरात) येथील गुरू दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी होणार प्राणप्रतिष्ठा
    – www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live संकेतस्थ‌ळावर प्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रक्षेपण

अखिल मंडई मंडळ  –

  • परंपरेनुसार मंगल कलश रथातून शारदा गजाननाचे उत्सव मंडपात आगंमन 
  • मिरवणुकीत नगारा वादन आणि तीन पथकांचा समावेश
  • स्वामी समर्थ भक्त अनंत गोगावले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता प्रतिष्ठापना

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती  –

  • परंपरेप्रमाणे गणरायाची मिरवणूक 
  • मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांचा समावेश
  • उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यांचे हस्ते १२ वाजून १० मिनिटांनी प्रतिष्ठापना
    – www.bhaurangari.com या संकेतस्थळावर ऑनलाइन दर्शनाची सुविधा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After two years ganapati will arrive with the sound of drums in pune pune print news msr