स्थानिक मैदानापाठोपाठ, महाराष्ट्र केसरीचेही मैदान जिंकल्यावर हिंद केसरीचेही मैदान मारणाऱ्या पुण्याच्या अभिजीत कटके याने आता आपले लक्ष्य ऑलिम्पिकवर असल्याचे मत व्यक्त केले. पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे वारे वाहत असतानाच अभिजीतने हैदराबाद येथील मैदान जिंकून हिंद केसरी किताबाचा मान मिळविला. यानंतर वेळात वेळ काढून अभिजितने शुक्रवारी पुण्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला उपस्थिती लावली. त्या वेळी अभिजीतशी संवाद साधला असता त्याने कुस्ती आणि महाराष्ट्राची प्रगती याबाबत आपली मते मोकळेपणाने व्यक्त केली.
तुझ्या कुस्तीला कशी सुरुवात झाली ?
वडील चंद्रकांत कुस्ती खेळायचे. पण, त्यांची कुस्ती कायम ठेवण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. त्यानंतर त्यांनी माझ्यात त्यांचे स्वप्न पाहिले. वडिलांनी कुस्तीचे प्राथमिक धडे दिले. लहानपणापासून शिवरामदादा तालीमीतच माझी जडण घडण झाली. वडील शेती करत होते. शेतीकडे लक्ष्य पुरवत वडिलांनीच मला प्राथमिक दिले. वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू झालेला हा प्रवास नंतर जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर येऊन पोचला. कुमार गटात राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आणि हा स्पर्धात्मक प्रवास जसा वाढला तशी माझ्या खेळात प्रगती झाली. या सगळ्या प्रवासात वस्ताद गुलाब पटेल, हणमंत गायकवाड, भरत म्हस्के, अमर निंबाळकर यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली.
प्रथम महाराष्ट्र केसरी आणि आता हिंद केसरी असे दोन महत्वाचे किताब जिंकणार असे वाटले होते का ?
कुस्तीला सुरुवात केल्यावर आपल्याला याच खेळात नाव कमवायचे हे निश्चित केले होते. मोठ्या कुस्ती जिंकायचे स्वप्न निश्चित उराशी होते. पण, तेथ पर्यंत पोचण्यासाठी मेहनत महत्वाची होती. त्यामुळे एकेक पायरी पार करत प्रथम महाराष्ट्र केसरीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि ते स्वप्न पुण्यातच २०१७ मध्ये साकार झाले याचा अधिक आनंद आहे. त्यानंतर मेहनत कायम ठेवली. पूर्ण तयारी झाली तेव्हाच हिंद केसरी स्पर्धेत लढण्याचा निर्णय घेतला. गेल्याच आठवड्यात हैदराबादमध्ये हरयानाच्या सोमवीरला पराभूत केले तेव्हा वडिलांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद झाला. वडिलांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे मला माझ्या मेहनतीपेक्षा वडिलांना मला घडविण्यासाठी सोसावा लागलेला त्रास अधिक मोलाचा वाटतो. ते नसते, तर मी घडलोच नसतो.
कारकीर्द घडत असताना वजन कायम राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काय प्रयत्न करतोस ?
कुस्ती हा एक खेळ वजन गटात होत असल्यामुळे वजन राखणे हे सर्वांत आव्हान असते. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम करण्याकडे माझा कटाक्ष असतो. रोज सकाळ, संध्याकाळ तीन तास सराव करतो. सध्या जगमल यांच्याकडे मी मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रात सरावाची सुविधा सध्या तरी उपलब्ध आहे. सरावाला चांगले जोडीदार मिळत असल्याने मला कुस्तीचाही चांगला सराव मिळत आहे.
यापुढील उद्दिष्ट काय ?
जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय मैदान मारल्यावर आता मला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ खुणावत आहे. त्यादृष्टिने मेहनत घेत आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि देशाला पदक मिळवून देण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी सध्या तरी पुण्यातच सराव करणार आहे.
महाराष्ट्रातील कुस्तीबद्दल काय म्हणशील ?
महाराष्ट्रातील कुस्ती सध्या निश्चित प्रगती करत आहे. कुमार आणि खुल्या पातळीवर महाराष्ट्राचे मल्ल आपले नाव ठसढशीत पणे उमटवत आहे. मॅटवरील कुस्ती आता अधिक लोकप्रिय होत आहे. या बदलाशी महाराष्ट्रातील मल्लांनी चांगले जुळवून घेतले आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रातील मल्ल मोठ्या व्यासपीठावर यशस्वी होताना दिसून येतात. या मल्लांनी डोळ्यासमोर मोठे उद्दिष्ट ठेवले, तर त्यांना यशापर्यंत जाण्याचा मार्ग सापडू शकतो. या प्रवासात कठोर मेहनत घेणे मात्र आवश्यक आहे.