दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये विविध देखावे सादर करण्यासाठी सध्या सार्वजिनक गणेश मंडळांची लगबग सुरू आहे. त्यासाठी पोलिसांची परवानगी मिळविण्याची प्रक्रियाही करण्यात येत आहे. अशाच एका प्रकरणात अफजल खानाच्या वधाचा जिवंत देखावा सादर करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत ही परवानगी नाकारण्यात आली आहे.
हेही वाचा – पुणे : आपल्याकडे चित्रकला आजही दुर्लक्षितच ; चंद्रमोहन कुलकर्णी यांची खंत
गणेशोत्सवात मंडळांकडून ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक आदी विविध विषयांवर देखावे सादर केले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये जिवंत देखावे सादर करण्याकडे अनेक मंडळांचा कल वाढला आहे. ऐतिहासिक, पौराणिक किंवा सामाजिक विषय घेऊन गणेश भक्तांना खिळवून ठेवणारे नाट्य जिवंत देखाव्याच्या माध्यमातून सादर केले जाते. यंदा शहरातील काही मंडळांकडून अफजल खानाच्या वधाच्या देखाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. संगम तरुण मंडळाने याच विषयावरील जिवंत देखाव्यासाठी कोथरूड पोलिसांकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत त्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. इतर काही मंडळांबाबतही हाच अनुभव आहे. याबाबत मंडळांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात येणार आहे