पुणे : राज्याच्या विविध भागांत पुढील चार ते पाच दिवस पावसाची हजेरी कायम राहणार आहे. मोसमी पावसाचा राज्यातील परतीचा प्रवास यंदाही नियोजित सर्वसाधारण वेळेपेक्षा उशिराने होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मुंबई, ठाणे परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला, पश्चिम महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस झाला.
शुक्रवारी मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पावसाची हजेरी होती. कोकणात रत्नागिरीसह विविध भागांत, तर मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत कोकणातील रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील गगनबावडा, नेवासा, मराठवाडय़ातील परांडा आदी भागांत १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. पुढील तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
राजस्थान, पंजाब, दिल्ली, चंडीगड, जम्मू-काश्मीर, गुजरात आदी राज्यांतून मोसमी पावसाने परतीचा प्रवास केल्यानंतर त्याचा वेग सध्या मंदावला आहे. नियोजित सर्वसाधारण वेळेनुसार महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरला मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणे अपेक्षित असते. मात्र, यंदाही राज्यातून पाऊस माघारी फिरण्यास उशीर होणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी त्याला राज्यातून माघारी फिरण्यास तब्बल महिन्याचा विलंब झाला होता.
कारण काय?
देशाच्या पश्चिमेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ांचा परिणाम म्हणून राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या आंध्र प्रदेश ते गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ही प्रणाली महाराष्ट्रातून जात असल्याने विविध भागात पावसाची हजेरी आहे.
पर्जन्यभान..
- कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांत ११ ऑक्टोबपर्यंत, तर मुंबईत पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.
- उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांत पुढील ३ ते ४ दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
- मराठवाडय़ातील औरंगाबाद, लातूर, परभणी, बीड आदी जिल्ह्यांत, तर विदर्भात तुरळक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.