समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या थकीत शुल्काची रक्कम मिळावी आणि शुल्कासाठी महाविद्यालयाकडून होणारी अडवणूक बंद व्हावी, यासाठी आरक्षण हक्क समिती आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) गुरुवारी समाजकल्याण संचालनालयासमोर आंदोलन केले.     
समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शुल्क देण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालयाला हे शुल्क मिळाले नाही. त्यामुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडे शुल्काची मागणी केली आहे. समाजकल्याण विभागाकडून या महाविद्यालयाला २ कोटी ७९ लाख रुपये शुल्क येणे आहे. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना द्वितीय आणि तृतीय वर्षांसाठी प्रवेश न देण्याची भूमिका महाविद्यालयाने घेतली असून त्याचा फटका महाविद्यालयातील साधारणत: ४०० विद्यार्थ्यांना बसणार आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागासमोर आंदोलन केले.
या वेळी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवण्याबाबत महाविद्यालयाला नोटीस देण्यात येईल. शुल्क माफी किंवा शिष्यवृत्ती मिळालेल्या मागसावर्गीय विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने जबरदस्तीने वसूल केलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत आदेश काढण्यात येतील आणि दोषी प्राचार्यावर कारवाई करण्यात येईल. पुणे जिल्ह्य़ातील सर्व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्याची जुलैच्या पहिल्या आठवडय़ात बैठक घेऊन विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवण्याबाबत निर्देश देण्यात येतील. राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या थकबाकीचा आढावा घेऊन शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येईल, अशी आश्वासने समाजकल्याण संचालक आर. के. गायकवाड यांनी दिली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

Story img Loader