पीएमपीने केलेली वीस टक्के भाडेवाढ सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय करणारी असून, दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास पुणेकरांच्या हितासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
पीएमपीने तिकीटदरात तसेच सर्वप्रकारच्या पासदरात वाढ केली असून, या भाडेवाढीच्या विरोधात शिवसेनेचे महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ यांनी सोमवारी प्रशासनाला निवेदन दिले. नगरसेवक पृथ्वीराज सुतार, प्रशांत बधे, सचिन भगत, संगीता ठोसर यांच्याही या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. पीएमपीने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याऐवजी वीस टक्के भाडेवाढ केली आहे. हा पुणेकरांवर अन्याय आहे. सहा किलोमीटरच्या पुढील प्रत्येक टप्प्यात आणि दैनंदिन, मासिक व इतर सर्व पासच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना भरुदड पडणार आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सन २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी यांचे विलीनीकरण करण्यात आले आणि पीएमपी ही नवी कंपनी स्थापन करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र पीएमपीच्या सेवेची दुरवस्था झाली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
दरवाढ मागे न घेतल्यास पुणेकरांच्या हितासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशाराही शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation by shivsena on pmt ticket rate hike