नदीपात्रातील राडारोडा उचलण्याबाबत महापालिका आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतरही राडारोडा उचलला न गेल्यामुळे तसेच राडारोडा टाकला जाणार नाही यासाठी महापालिकेने कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी कार्यकर्त्यांसह जागेवरच आंदोलन केले. त्यानंतर आयुक्तांनी पुन्हा नदीपात्राची पाहणी करून ठोस कारवाईचे आश्वासन दिले.
नदीपात्रात राडारोडा आणि कचरा टाकण्याच्या प्रकाराकडे खासदार चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार यांच्याबरोबर त्यांनी नदीपात्राची पाहणी देखील केली होती. या पाहणीत नदीपात्रात राडारोडा टाकण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यावेळी नदीपात्रात महापालिकेनेच कचऱ्याचे चार कंटेनर तसेच मुरुम, दगड आणि फरशा टाकलेल्या दिसल्या होत्या. नदीपात्रात चारचाकी गाडय़ांचे पार्किंगही वाढत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले होते. या प्रकारांची दखल घेऊन कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते.
त्या आश्वासनानंतर खासदार चव्हाण यांनी शनिवारी पुन्हा नदीपात्राची पाहणी केली असता महापालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्याचे, तसेच आणून टाकण्यात आलेल्या साहित्यात भर पडल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत आयुक्त स्वत: येऊन ठोस पावले उचलत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचे त्यांनी जाहीर केल्यानंतर आयुक्त आणि उपायुक्त सुरेश जगताप यांनी नदीपात्राची पुन्हा पाहणी केली.
नदीपात्राला महापालिकेने डंपिंग ग्राऊंड बनवले आहे. राडारोडा टाकला जाऊ नये यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. याबाबत तातडीने ठोस कार्यवाही करावी तसेच नदीपात्रात सुरू असलेले पार्किंगही बंद करावे, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी या वेळी आयुक्तांकडे केली. त्यानंतर नदीपात्रातील राडारोडा, कचरा तातडीने उचलण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
नदीपात्रात पुन्हा राडारोडा; वंदना चव्हाण यांचे आंदोलन
नदीपात्रातील राडारोडा उचलला न गेल्यामुळे तसेच राडारोडा टाकला जाणार नाही यासाठी महापालिकेने कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी आंदोलन केले.
First published on: 31-05-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation by vandana chavan