दिवसभर मोठय़ा प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आणि विद्यार्थ्यांची घोषणाबाजी अशा वातावरणात ‘एफटीआयआय’ सोसायटीच्या नियामक मंडळाची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. सोसायटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासूनच वादग्रस्त ठरलेले अभिनेते गजेंद्र चौहान यांनी या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून ‘सीआयडी’ मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक बी. पी. सिंग यांची निवड करण्यात आली असून तेच संस्थेच्या शैक्षणिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असा ठराव बैठकीत करण्यात आला.
चौहान यांनी त्यांच्या पहिल्याच भेटीत संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. प्रसारमाध्यमांशी मात्र त्यांनी वा कोणत्याही सदस्याने न बोलणेच पसंत केले. चौहान व सिंग यांच्यासह प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, अभिनेते सतीश शहा, राहुल सोलापूरकर, चित्रपट विभागाचे सहसंचालक संजय मूर्ती आणि अतिरिक्त सचिव व आर्थिक सल्लागार डॉ. सुभाष शर्मा यांनी नियामक मंडळाच्या बैठकीत भाग घेतला, तर अनघा घैसास, प्रांजल सैकिया, नरेंद्र पाठक, समीक्षक भावना सोमय्या, ऊर्मिल थापलियाल बैठकीस उपस्थित होते.
नियामक मंडळाने बैठकीत एफटीआयआयच्या २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षांच्या वार्षिक अहवालास तसेच लेखा विवरण पत्राला मंजुरी दिली. तसेच २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व २०१६-१७ च्या आर्थिक अंदाजपत्रकालाही मान्यता देण्यात आली.
अधिकारी सदस्यांपैकी चित्रपट विभागाचे महासंचालक मुकेश शर्मा, एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे विशेष अधिकारी चैतन्य प्रसाद, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रवण कुमार, सत्यजित रे फिल्म इन्स्टिटय़ूटचे संचालक संजय पटनायक यांची बैठकीस उपस्थिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा