निगडी पेठ क्रमांक २२ येथे गेल्या पाच महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार सांगूनही महावितरण अधिकारी दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत या भागातील रहिवाशांनी निगडी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
निगडीतील पेठ क्रमांक २२ येथील विद्युत पुरवठा अनेक दिवसांपासून वारंवार खंडीत होत आहे. याशिवाय इतर अनेक समस्या आहेत. विद्युत विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर अंधार होतो, त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. ऑनलाईन काम करणाऱ्यांचा खोळंबा होतो. अशा तक्रारी करत नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला.
हेही वाचा : पुणे : जिल्ह्यातील विशेष शाळांची वर्षातून तीन वेळा तपासणी
तरीही समस्या सुटली नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे मनसेचे शहराध्यक्ष व या भागाचे माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले. विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा चिखले यांनी दिला आहे.