राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. हा राज्यातील १३ कोटी जनतेचा अपमान असून सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून मंत्रिमंडळ आणि सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोणी पालकमंत्री देता का, अशी विचारणाही या वेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, प्रवक्ता प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, विक्रम जाधव, आनंद सवाने, समीर शेख, वेणू शिंदे, दीपक जगताप, शंतनू जगदाळे, नाना नलावडे, महेंद्र पठारे, प्रदीप गायकवाड उपस्थित होते.
शहर आणि जिल्हा राज्याचे शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीय केंद्र आहे. मात्र शहराचा कारभार गेल्या एक महिन्यापासून पालकमंत्र्यांशिवाय सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच काम करत असल्याने अनेक बाबींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट ओढवले असून आपत्कालीन परिस्थितीत मंत्रीच नसतील तर खात्यांचा कारभार कोणाच्या भरवशावर सुरू आहे, अशी विचारणा प्रशांत जगताप यांनी केली.
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.