मुंढव्यातील पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये असुविधा आणि सुरक्षेच्या प्रश्नावर पुण्यातील पारपत्र कार्यालयाच्या प्रश्नावर पुढील आठवडय़ात परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद बैठक घेणार असल्याची माहिती पारपत्र तक्रार निवारण समितीचे सदस्य संदिप खर्डेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या प्रश्नांबाबत सोमवारी पासपोर्ट सेवा केंद्रासमोर आंदोलनही करण्यात येणार आहे.
मुंढव्यातील पारपत्र कार्यालयामध्ये नागरिकांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. त्याचप्रमाणे पारपत्र कार्यालय हे सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील भाग असूनही या कार्यालयामध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही, कर्मचाऱ्यांना गणवेश नाही.  या बाबत मुंढवा पोलिस ठाण्याने कार्यालयाला अनेक वेळा नोटीस दिली असून या नोटिसीकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याची बाब पारपत्र तक्रार निवारण समितीच्या सदस्यांच्या लक्षात आली. पारपत्र मिळण्यास होणारा विलंब, अनेक वेळा खेटे घालूनही समाधानकारक उत्तरे न मिळणे अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून यात आहेत अशी माहिती खर्डेकर यांनी दिली. या सर्व बाबींवर सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये खासदार प्रकाश जावडेकर सहभागी होणार आहे.
पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रातील असुविधा आणि सुरेक्षेच्या प्रश्नावर पुढील आठवडय़ामध्ये परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद पुढील आठवडय़ात खासदार प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत.