राज्यातून फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे. २०२०-२१ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातून होणारी शेतीमालाची निर्यात २२ टक्क्यांनी वाढली आहे, त्यात द्राक्षे आणि केळीचा वाटा सर्वाधिक आहे. आनंदाची बाब म्हणजे चंद्रपूर, भंडारासारख्या मागास जिल्ह्यांतूनही भेंडीची निर्यात होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२२८५ कोटी रुपये किमतीच्या द्राक्षांची निर्यात –

कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातून २२८५ कोटी रुपये किमतीच्या द्राक्षांची निर्यात झाली आहे. देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के असून, नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतून द्राक्ष निर्यात झाली आहे. बेदाण्याची निर्यातही सुमारे १६० कोटींवर गेली आहे, त्यात सांगली, नाशिक आणि सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे.

डाळिंब, संत्रा, चिकूलाही चांगली मागणी –

द्राक्षापाठोपाठ केळीच्या निर्यातीत वेगाने वाढ होत आहे. जळगाव, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून ९२३ कोटी रुपयांच्या सुमारे २,७३,३८१ टन केळींची निर्यात विशेषकरून आखाती आणि युरोपीय देशांना झाली आहे. आंब्याच्या निर्यातीतही वाढीचा कल आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पुणे, सातारा, औरंगाबाद, नाशिक आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून २८३ कोटी रुपये किमतीच्या २०,८७३ टन आंब्यांची निर्यात झाली आहे. त्या खालोखाल डाळिंब, संत्रा, चिकूलाही चांगली मागणी असून, निर्यातही वाढताना दिसत आहे.

नऊ कोटी रुपयांच्या भेंडीची निर्यात –

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार, पालघर, चंद्रपूर, भांडारा या जिल्ह्यांतून भाजीपाल्याची निर्यात सुरू झाल्याचे आनंददायी चित्र २०२१-२२ या आर्थिक वर्षांत दिसून आले आहे. नऊ कोटी रुपयांच्या भेंडीची निर्यात झाली असून, पुणे, सातारा जिल्ह्याच्या बरोबरीने भंडारा, चंद्रपूर, नागपूर, ठाणे, पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यातून निर्यात सुरू झाली आहे. २७४ कोटी रुपयांच्या ४१०२२ टन हिरव्या मिरचीची निर्यात झाली असून, प्रामुख्याने सोलापूर, सातारा, ठाणे जिल्ह्याच्या बरोबरीने नंदुरबार, भंडारा, बीड, नागपूर, अमरावती येथूनही निर्यातीने गती घेतली आहे. यासह कांदा, टोमॅटो, मक्याचे गोड दाणे आणि प्रक्रिया केलेल्या भाजीपाल्यांची निर्यातही वाढली आहे.

सर्वच जिल्ह्यांतून निर्यात वाढीसाठी प्रयत्न सुरू –

“अपेडा, राज्याचा कृषी विभाग आणि प्रगतीशील शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे. भंडारा, चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातून दर्जेदार भाजीपाल्याचे उत्पादन होऊ लागले आहे. शेतीमालाच्या निर्यातीचा हा वाढता काल कायम ठेवून राज्याच्या सर्वच जिल्ह्यांतून निर्यात वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. चांगले पैसे मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.” असे कृषी विभागाचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural exports from the state increased by 22 percent grapes and bananas have the highest share pune print news msr