केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मद्य आणि मद्ययुक्त पेयांवर १०० टक्के कृषी अधिभार लावण्यात आल्याने मद्य ग्राहकांना फटका बसला आहे.
करोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बिअरबार आणि परमीटरूम व्यवसाय अडचणीत असताना, मद्यावरील कृषी अधिभारामुळे या व्यावसायिकांसमोर आणखी समस्या निर्माण होणार असून मद्य ग्राहकांच्या खिशालाही झळ बसणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना मद्य ग्राहकं ना जोरदार झटका दिला आहे. मद्य आणि मद्ययुक्त पेयांवर १०० टक्के कृषी अधिभार लावण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किमतीत वाढ होणार आहे.
करोनामुळे बिअरबार आणि परमीटरूम व्यवसाय हा अडचणीत आला आहे. मद्यावरील कृषी अधिभारामुळे या व्यवसायाला आणखी आर्थिक फटका बसणार आहे. त्याचबरोबर मद्यपींना प्रत्यक्ष मद्यालयात जाऊन मद्य प्राशन करणे महाग होणार आहे.
याबाबत पुणे रेस्टॉरंट अॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ‘मद्यावरील अधिभारामुळे मद्याच्या किमतीत वाढ होणार आहे. सध्या बिअरबार आणि परमीटरूम व्यावसायिकांकडे जुना साठा आहे. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवस दरात फारशी वाढ होणार नाही. मात्र, त्यानंतर दरवाढ होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मद्यविक्री बंद करण्यात आली होती. तसेच बिअरबार आणि परमीट रूम हे बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकांबरोबरच या ठिकाणी काम करणाऱ्या कामगार वर्गाला आर्थिक झळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर मद्य आणि मद्ययुक्त पेयांवर अधिभार लावण्यात आल्याने या व्यवसायासमोर संकट उभे राहणार आहे.’