महात्मा फुले कृषी विद्यापीठाची महापालिकेला जागा देण्यास मान्यता

पुणे : कृषी महाविद्यालयाच्या बोटॅनिकल गार्डनमधील जागा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी (एसटीपी) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभेत या प्रकल्पासाठी ३० गुंठे जागा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून याला राज्य सरकारने मान्यता द्यावी, अशी शिफारस करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृषी महाविद्यालयाच्या बोटॅनिकल गार्डनमधील जागा पालिकेच्या एसटीपी प्रकल्पासाठी देण्यात यावी, असा प्रस्ताव गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित होता. या प्रस्तावावर वेगवेगळी कारणे देत वन विभागासह राज्य जैवविविधता मंडळाने यामध्ये दिरंगाई केली. मात्र अखेरीस राहुरी कृषी विद्यापीठाच्या सभेत हा प्रस्ताव मान्य करून तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा >>> पूर्वसुरींच्या नैतिक राजकारणाचा वस्तुपाठ

शहरातील विविध भागांत मैलापाणी तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेच्या वतीने मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली जात आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या (जायका) वतीने आर्थिक भार उचलला जात आहे. शहरात ११ ठिकाणी ही मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. यापैकी पालिकेच्या वतीने १० ठिकाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे सुरू झाली असून ती प्रगतिपथावर आहेत. मात्र कृषी महाविद्यालयाने जागा देण्यास मान्यता न दिल्याने हे काम रखडले होते.

हेही वाचा >>> दिवाळी अशी करा साजरी, महापालिकेने का केले हे आवाहन

या जागेवर महापालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. पालिकेने ही जागा मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आणि जोड रस्त्यासाठी विकास आराखड्यामध्ये (डीपी) आरक्षित केली होती. मात्र, संबंधित ठिकाण राज्य सरकारच्या वन विभागाने जैवविविधता वारसा क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने महापालिकेला तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. केंद्र सरकारच्या पथकाने देखील गेल्या वर्षी या प्रकल्पाचा आढावा घेत ही अडचण दूर करण्याची सूचना राज्य सरकारला दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षीपासून हा प्रस्ताव वन खात्याकडे प्रलंबित होता. वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय होत नसल्याने पालिकेतील अधिकारी देखील त्रस्त झाले होते. त्यामुळे पालिकेने राहुरी कृषी विद्यापीठाकडे पाठपुरावा करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. ही जागा पालिकेला मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी देण्याच्या प्रस्तावाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural university to give botanical garden land to pmc for sewage treatment project pune print news ccm 82 zws