पुणे: मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये शेतमजुरांना सर्वात कमी मजुरी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) याबाबत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशात सरासरी २१७.८ रुपये, तर गुजरातमध्ये २२०.३ रुपये प्रति दिन इतकी देशात सर्वात कमी मजुरी मिळते. महागाई आणि व्याजदर वाढताच ‘आरबीआय’कडून (पान ४ वर) (पान १ वरून) शेतमजुरांना मिळणाऱ्या मजुरीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सर्वात कमी म्हणजे २१७.८ रुपये इतकी प्रति दिन मजुरी ही मध्य प्रदेशात देण्यात आल्याची नोंद आहे. त्याखालोखाल गुजरातमध्ये २२०.३ रुपये इतकी मजुरी दिली जाते. उत्तर प्रदेशात २८८, बिहारमध्ये २९०.३, महाराष्ट्रात २८४.२, हरियाणात ३९५, तमिळनाडूत ४४५.६, हिमाचल प्रदेशात ४५७.६, जम्मू आणि काश्मीरमध्ये ५२४.६ तर केरळमध्ये सर्वाधिक ७२६.८ रुपये इतकी मजुरी दिली जाते, असे स्पष्ट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 देशात आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रतिदिन सरासरी मजुरी ३०९.९ रुपये मिळत होती, तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ३२३.२ रुपये इतकी मजुरी मिळाल्याची नोंद आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतमजुरांना सरासरी तेरा रुपये जास्त मिळतात, असेही ‘आरबीआय’ने म्हटले आहे.  गुजरातचा विचार करता एका शेतमजुराला एका महिन्यात सरासरी २५ दिवस काम मिळते, असे गृहीत धरल्यास एका मजुराला महिन्याला सरासरी साडेपाच हजार रुपये एकूण मजुरी मिळते. केरळमध्ये एका मजुराला महिन्याला सरासरी १८,१७० रुपये मजुरी मिळते. करोना साथीच्या काळात शहरी अर्थव्यवस्थेसह ग्रामीण भागातील शेती आधारित अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले होते. त्याचा शेतमजुरांना मोठा फटका बसला होता. कमी मजुरी असणाऱ्या राज्यांतील मजुरांची स्थिती अत्यंत बिकट झाली होती.

देशभरातील २५ लाख मजूर केरळमध्ये

देशात सर्वाधिक मजुरी केरळमध्ये मिळते. तिथे सरासरी ७२६.८ रुपये इतकी मजुरी मिळत असल्याने देशभरातून आलेले सुमारे २५ लाख मजूर केरळमध्ये स्थायिक झाले आहेत. हे मजूर प्राधान्याने बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांतील आहेत.

महाराष्ट्रात मजुरी ५०० रुपयांवर 

महाराष्ट्रात शेतमजुरांची एका दिवसाची मजुरी सरासरी २८४.२ रुपये आहे, असे ‘आरबीआय’ने नमूद केले असले तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळीच आहे. पश्चिम महाराष्ट्रात वर्षभर सकाळी सात ते दुपारी बारा (पाच तास) या वेळेत काम करण्यासाठी पुरुष ४०० रुपये मजुरी घेतात, तर महिला सकाळी नऊ ते तीन (सहा तास)  या वेळेत काम करण्यासाठी सरासरी ३०० रुपये मजुरी घेतात. खरीप आणि रब्बी हंगामातील पेरणी आणि काढणीच्या दिवसांत पुरुषांची मजुरी ५५० रुपयांवर तर महिलांची मजुरी ३५० रुपयांवर जाते. विदर्भ, मराठवाडय़ात हंगामनिहाय आणि पीकनिहाय मजुरीच्या दरात फरक दिसून येतो. ही मजुरी पुरुषांना सरासरी ३५० ते ५०० रुपये, तर महिलांना सरासरी २०० ते ३५० रुपये मिळते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural wages low madhya pradesh gujarat highest salary in kerala ysh