शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत १३ हजार ९८१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९३ टक्के भरले आहे. चारही धरणांमध्ये २८.९२ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी जमा झाले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ७० मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी ४१ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या सहा मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुठा नदीत १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.
मंगळवारी सकाळपासून वरसगाव आणि पानशेत धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. वरसगाव धरणातून २९८५ क्युसेक, तर पानशेत धरणातून ४४८० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सकाळी नऊ वाजल्यापासून १३ हजार ९८१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणांच्या परिसरातील पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याच्या विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येईल, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.
दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे १०० टक्के, तर टेमघर धरण ९३ टक्के भरले आहे. लवकरच टेमघर धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत जमा झाला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत
टेमघर ३.४७ ९३.७२
वरसगाव १२.८२ १००
पानशेत १०.६५ १००
खडकवासला १.९७ १००
एकूण २८.९२ ९९.२०