पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राेबाेटिक्सच्या काळात दुरुस्ती करणे हा भाग बाजूला पडेल. मानवी चुका दूर करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होईल. मात्र, त्याचवेळी दुरुस्ती करण्यापेक्षा बदलण्याची संस्कृती वाढू शकते. या प्रक्रियेचा वेध घेत तरुणाईने अधिक काैशल्ये विकसित केली पाहिजेत,’ असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ किरण कर्णिक यांनी मांडले.
‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’तर्फे आयाेजित प्रा. राम ताकवले स्मृती व्याख्यानात ‘द रोल ऑफ ह्युमन्स इन द एज ऑफ रोबोट्स अँड एआय’ या विषयावर कर्णिक बोलत होते. सारथी संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकाेडकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डाॅ. विजय भटकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजीव साेनवणे, ‘एमकेसीएल’चे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत, व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे या वेळी उपस्थित हाेते.
कर्णिक म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आता सर्वच क्षेत्रे व्यापत आहे. त्यामुळे माेठ्या प्रमाणावर राेजगाराचा प्रश्न गंभीर हाेणार आहे. मात्र, प्रत्येक नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन राेजगार निर्माण होतात, असा आजवरचा इतिहास आहे. एआय तंत्रज्ञानाने काहींचा राेजगार जाणार असला, तरी नवीन रोजगारही उपलब्ध होतील. त्यात प्रामुख्याने नवसंकल्पना, नवा विचार, व्यापक आणि सखोल विचार करू शकणाऱ्यांना अधिक मागणी असेल. शिक्षण क्षेत्रातही ‘एआय’मुळे प्रश्न तयार करणे, एखादी गाेष्ट तपासणे, मूल्यमापन करणे सुलभ होईल. हा शिक्षक चोवीस तास उपलब्ध असेल. एखाद्या माहितीचे तत्काळ विश्लेषण करून मिळेल. त्यातून आकलन प्रगत हाेऊ शकेल.’
सामाजिक सुरक्षा योजनांची गरज
‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) प्रत्येक काम सुलभतेने होऊ शकणार आहे. त्यामुळे माणसांमध्ये रिकामेपण, नैराश्य वाढू शकते. त्यातून आत्महत्या, गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे. परिणामी, सामाजिक सुरक्षेच्या वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागू शकतात,’ याकडेही कर्णिक यांनी लक्ष वेधले.