लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टीफिशियल इंटलिजन्स) वापर करण्यात येणार आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांकडून दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाटामार्गे गेलेल्या मोबाइल वापरकर्ते, त्यांचे नाव, पत्ते याबाबतच्या माहितीचे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

आणखी वाचा-अपघाताने सायकलपटू बनलेल्या किरीटचे अनोखे यश, आव्हानात्मक लांबपल्ल्याच्या सायकिलंगसाठी एलआरएम पुरस्काराचा मानकरी

बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. आरोपींची माहिती असल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. पुण्यासह सोलापूर, तसेच सातारा जिल्ह्यातील सराइतांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी संकलित करण्यात आलेल्या माहितीचे ‘एआय’तंत्रज्ञानाच्या आधारे विश्लेषण करण्यात येणार आहे. बोपदेव घाटातील टेबल पॉईंट परिसरात महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला गुरुवारी मध्यरात्री मारहाण करण्यात आली. तरुणीवर आरोपींनी बलात्कार केला. आरोपींनी मारहाण करण्यासाठी वापरलेला बांबू आणि रक्त आढळून आले. पोलिसांनी रक्ताचे नमुने, बांबू, तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ai technology will be use in bopdev ghat gang rape case pune print news rbk 25 mrj