पुणे : पुणे रेल्वे स्थानकात आता कृत्रिम प्रज्ञेची (एआय) नजर राहणार आहे. स्थानकात अत्याधुनिक ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसविण्यात येणार आहेत. कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्याने हे कॅमेरे स्थानकातील संशयास्पद हालचाली टिपणार आहेत. त्याबाबत ते रेल्वे प्रशासनाला तातडीने माहितीही देणार आहेत. स्थानकावर लवकरच हा ३० दिवसांचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे मंत्रालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात अधिकाधिक व्हावा, यासाठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत प्रत्येक रेल्वे विभागाला कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल, याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले होते. पुणे विभागाने एकूण सात प्रकल्प मुख्यालयाकडे सादर केले होते. त्यातील टेहळणी यंत्रणेचा प्रस्ताव मुख्यालयाने मंजूर केला आहे. यात स्थानकावर ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसवून टेहळणी केली जाणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या मालकीच्या जिओ थिंग्ज लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

हेही वाचा – खळबळजनक! आमदाराच्या आश्रमशाळेत मुलाचा मृतदेह आढळला

रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे द्वार, आरक्षण केंद्रातील तिकीट खिडक्या येथे हे चार कॅमेरे बसविले जाणार आहेत. याचबरोबर स्थानकात सध्या असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेत जिओ ब्रीज ही उपकरणे बसविली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांची संख्या मोजणे आणि ते रांगेत आहेत की नाहीत या बाबी कळणार आहेत. रेल्वे स्थानकातील संशयास्पद हालचाली, तिकिटाचा काळाबाजार, बेकायदा पद्धतीने रांगा लावणे आदी गोष्टी या कॅमेऱ्यांमुळे शोधता येतील. त्यामुळे त्यांना आळा घालणे शक्य होईल.

कशा पद्धतीने राहणार नजर?

  • स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या कळणार
  • संशयास्पद हालचाल करणारा प्रवासी ओळखता येणार
  • तिकिटांचा काळाबाजारही शोधता येणार
  • बेकायदा पद्धतीने लावलेल्या रांगाही ओळखता येणार
  • स्थानकातील गैरप्रकारांचाही तातडीने शोध घेता येणार


हेही वाचा – मेट्रोच्या पुलाला तडे, गाडीचा वेग मंदावला!

पुणे रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जाईल. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ai use on pune railway station for security pune print news stj 05 ssb
Show comments