पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात भारताला अग्रस्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) २०२५ हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या, तसेच त्याबाबतचा अंमलबजावणी आराखडा ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एआयसीटीई’चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम यांनी याबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सन २०२५ हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून समाज आणि शिक्षणाची पुनर्बांधणी करण्याची संधी देणारे आहे. देशातील तंत्रशिक्षणामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ‘एआयसीटीई’ने इंडोव्हेशन केंद्र, शिक्षण-उद्योग सहकार्य, ९००हून अधिक तंत्रज्ञान कार्यक्रम, ६५हून अधिक बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञान हस्तांतर कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच, उद्योग जगतातील तज्ज्ञांना शिक्षण क्षेत्रात आणण्यासाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, नोकरदारांसाठी अभ्यासक्रम अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : उच्च शिक्षणातील बदलांचे शाळेपासूनच मार्गदर्शन, आता ‘स्कूल कनेक्ट २.०’

‘कृत्रिम बुद्धिमत्तेतील परिवर्तनीय क्षमतांवर ‘एआयसीटीई’चा भर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ तंत्रज्ञानातील कामगिरी नाही, तर त्यात उद्योग, अर्थ क्षेत्र आणि समाजाची पुनर्बांधणी करण्याची क्षमता आहे. या क्रांतीचा भाग होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण प्रणालीमधील समावेश केला पाहिजे,’ असे प्रा. सीतारामन यांनी नमूद केले आहे. ‘एआयसीटीई’ने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताला अग्रस्थानी नेण्याच्या दृष्टीने ‘एआय फॉर ऑल : फ्युचर बिगिन्स हिअर’ हा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्व विद्याशाखांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नावीन्य आणि संशोधनाला चालना, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उद्योगांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे, समाजाच्या हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर करणे, शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अध्यापन कौशल्ये वाढवण्यासाठी कार्यशाळा आणि प्रमाणपत्र कार्यक्रम, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संस्थांसोबत भागीदारी करणे यासह कृत्रिम बुद्धिमत्ता जागरूकता सप्ताह, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थी समुपदेशन, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीच्या प्रयोगशाळांची स्थापना असे काही उपक्रम सुचवण्यात आले आहेत. उच्च शिक्षण संस्थांनी या आराखड्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी आराखडा तयार करून तो ३१ डिसेंबरपर्यंत ‘एआयसीटीई’ला सादर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aicte announced 2025 as artificial intelligence year what educational institution need to do for ai education pune print news ccp 14 css