पदविका आणि अभियांत्रिकीचे एकूण २१ हजार प्रवेश कमी, ‘नीट’सारख्या गोंधळाचे भय
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा ‘नीट’ गोंधळ सुरू असतानाच अभियांत्रिकीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’कडून (एआयसीटीई) खेळ केला जात आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयही या प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाच्या वेळीही ‘नीट’ गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही, असे अभियांत्रिकी क्षेत्रातील अध्यापकांचे म्हणणे आहे.
राज्यात अभियांत्रिकीच्या सुमारे एक लाख ५४ हजार जागा आहेत तर पदविकेच्या एक लाख ७० हजार जागा असून गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीच्या सुमारे ५७ हजार जागा रिक्त राहिल्या. एकीकडे शैक्षणिक दर्जामुळे जागा रिकाम्या राहत असताना दुसरीकडे बहुतेक महाविद्यालयांमध्ये ‘एआयसीटीई’च्या निकषांचे पालन होत नसल्याचे एआयसीटीई व डीटीईच्या चौकशीत आढळून आले आहे.
राज्यातील महाविद्यालयांमध्ये अपुरी जागा, भोगवटा प्रमाणपत्र नसणे, प्रयोगशाळा नसणे अथवा कमतरता असणे, अपुरे शिक्षक असल्याचे दिसून येत आहे. तरीही एआयसीटीईने अशा महाविद्यालयांवर कधीही ठोस कारवाई तर केली नाही. अखेर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेल्या चौकशी-आदेशानंतर ‘डीटीई’ने ३४६ अभियांत्रिकी व पदविका महाविद्यालयांची चौकशी केली असता त्यांच्याकडे त्रुटी असल्याचे व एआयसीटीईच्या निकषांचे पालन होत नसल्याचे दिसून आले. यानंतर एआयसीटीईने व्हीजेटीआयमध्ये २०० महाविद्यालयांच्या चौकशीचा फार्स केला. यातही १४६ महाविद्यालयांना का वगळण्यात आले याचे कोणतेही कारण त्यांनी आजपर्यंत दिलेले नाही. एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी पारदर्शक कारभाराची हमी देऊनही प्रत्यक्षात कोणती कारवाई केली याची माहिती का दिली जात नाही, असा सवाल सिटिझन फोरमने उपस्थित केला आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे हेही गंभीर नसल्यामुळे खोटी माहिती देऊन फी पोटी शासनाच्या तिजोरीवर कोटय़वधी रुपयांचा डल्ला मारणारे संस्थाचालक व प्राचार्य मोकाटच असल्याचे प्राध्यापक वैभव नरवडे व अजय आंबेकर यांनी सांगितले.
दरम्यान ही बाब वेळोवेळी केलेल्या चौकशीत स्पष्ट होऊनही मंत्री विनोद तावडे खोटी माहिती देणाऱ्या प्राचार्यावर फौजदारी कारवाईसाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा सवाल सिटिझन फोरमने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झाले?
एआयसीटीईने व्हीजेटीआयमध्ये केलेल्या चौकशीनंतर कोणती कारवाई केली याची कसलीच माहिती त्यांनी वेबसाइट अथवा कोणत्याही माध्यमातून दिलेली नसल्यामुळे नेमके कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आगामी काळात संभ्रम निर्माण होणार आहे. एआयसीटीईने अभियांत्रिकी व पदविका तसेच व्यवस्थापनाच्या ५४ महाविद्यालयांना प्रथमवर्ष प्रवेशबंदी तसेच १३० महाविद्यालयांमध्ये प्रवेशक्षमता कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते. यातही पदविका आणि अभियांत्रिकीचे एकूण २१ हजार प्रवेश कमी होणार असून मुळाताच ५७ हजार जागा रिकाम्या राहत असल्यामुळे एआयसीटीईने नेमकी कारवाई काय केली व कोणावर केली हे स्पष्ट होऊ शकत नाही.