राज्यातील उद्योगक्षेत्राची गरज, विद्यार्थ्यांचा कल, अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागा अशा सर्व मुद्दय़ांच्या आधारे राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचा बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. देशभरातील सर्व राज्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचा जिल्हानिहाय बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिल्या आहेत.
एकीकडे राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहात आहेत. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांबाबत ही तक्रार सातत्याने होत आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहात असल्याचे चित्र गेले काही वर्षे दिसत आहे. त्याचवेळी या अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या नव्या संस्था उभ्या राहात आहेत. पदवी घेऊनही बेकार असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि दुसरीकडे आवश्यक कौशल्य असलेले मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची तक्रार उद्योग क्षेत्राकडून करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचा जिल्हानिहाय बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सर्व राज्यांना दिल्या आहेत.
राज्यातील उद्योगक्षेत्राची गरज, पुढील काही वर्षांमध्ये वाढणारी मनुष्यबळाची गरज, विद्यार्थ्यांचा कल, पुढील काही काळामध्ये अभ्यासक्रमांना मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अशा विविध मुद्यांच्या आधारे हा बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्य़ानुसार हा आराखडा तयार करण्याच्या सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाला दिल्या आहेत. या बृहत आराखडय़ाच्या आधारे देशपातळीवरील बृहत आराखडा तयार करून त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षांसाठी (२०१४-१५) अभ्यासक्रमांना आणि महाविद्यालयांना परवानगी देण्याची प्रक्रिया अमलात आणण्यात येणार आहे.
याबाबत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष ए. के. शुक्ला यांनी सांगितले, ‘‘राज्यात मोठय़ा प्रमाणावर तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहणार असल्याची तक्रार केली जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नव्या संस्थांना परवानगी देऊ नये अशी विनंती राज्यशासनाकडून केली जात आहे. मात्र, राज्यातील महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहण्याची समस्या ही गुणवत्तेशी निगडित आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लागत आहेत. प्रवेश मिळत आहे म्हणून घेण्यापेक्षा तो गुणवत्तपूर्ण शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रवेश परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. या बृहत आराखडय़ाच्या आधारे काळानुरूप आवश्यक असणारे नवे अभ्यासक्रम तयार करणे, कोणत्या राज्यात कोणत्या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना परवानगी द्यायची त्याची आखणी करण्यात येणार आहे.’’
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ३० नव्या संस्था
राज्यात या शैक्षणिक वर्षांपासून व्यवस्थापन, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या ३० नव्या संस्था सुरू करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिली आहे. यावर्षी तंत्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एकूण ६८ संस्थांचे अर्ज आले होते.