केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) देशभरातील एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य, कार्यानुभव आणि नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी डिजिटल स्किलिंग हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या द्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) या संदर्भात देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र देण्यात आले आहे. भारताला जगाचे तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवून डिजिटल स्किलिंग हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत एआयसीटीईकडून प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यासाठी तंत्रज्ञान ही मोहीम राबवली जाईल. त्यात विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून प्रशिक्षण, सराव, कार्यप्रशिक्षण, प्रमाणिकरण आणि नोकरी अशी प्रक्रिया असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी कार्यप्रशिक्षण संकेतस्थळ (इंटर्नशिप पोर्टल) विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्रातील कंपन्या कार्यप्रशिक्षण उपलब्धतेबाबतची नोंदणी करतात. तसेच विद्यार्थ्यांना काम करतानाच प्रशिक्षण देतात.
या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांनी डिजिटल स्किलिंग उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच डिजिटल स्किलिंग उपक्रमात नोंदणी करून विद्यार्थ्यांना कौशल्यवृद्धी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.