लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने एक लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २६ एप्रिल रोजी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजातील छोटे-मोठे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना बळ देण्यासाठी लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जावरील परतावा महामंडळ देणार आहे.
महामंडळाच्या ५५६ लाभार्थ्यांना कर्ज आधी मिळाले. मात्र, प्रमाणपत्र नंतर मिळाले. या लाभार्थ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत असलेली दहा लाखांची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवून कालावधी परतफेड सात वर्षांपर्यंत करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने सन २०२३-२४ या अर्थसंकल्पात महामंडळाला मंजूर झालेल्या एकूण ३०० कोटी रुपयांपैकी ३० कोटींचा पहिल्या टप्प्यातील निधी महामंडळाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी दिली.
आणखी वाचा-जिल्ह्यातील ४० हजार नागरिक तहानलेले; २४ गावांत २० टँकरने पाणीपुरवठा
दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय लवकरच प्रसृत होईल. महामंडळाच्या कर्ज योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
५९ हजार लाभार्थ्यांना कर्ज
दहा हजार ते दोन लाखांपर्यंतची कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना या दोन योजनांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आजपर्यंत महामंडळाच्या योजनेंतर्गत एकूण ५९ हजार ८७४ लाभार्थ्यांना तब्बल ४१८१ कोटींचे कर्ज वितरण बँकांकडून करण्यात आले, तर ४१५ कोटींचा व्याज परतावा महामंडळाकडून लाभार्थ्यांना देण्यात आला आहे, असेही पाटील यांनी सांगितले.