पैसे भरून प्रलंबित असलेल्या एकूण एक लाख ८० हजार १०६ कृषिपंपांना येत्या मार्च २०२३ पर्यंत नवीन वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी गेल्या नोव्हेंबरपर्यंत ७४ हजार ८८१ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उर्वरित एक लाख ५ हजार २२५ वीजजोडण्या येत्या मार्चपर्यंत देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिली. कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्यासोबतच नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत

पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये बुधवारी आयोजित बैठकीत पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यांचा तसेच नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या कामाचा आढावा संचालक ताकसांडे यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा >>>राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला व्यापाऱ्यांचा पाठिंबा

ताकसांडे म्हणाले, या महिन्यापासून मार्च २०२३ पर्यंत दरमहा ३० हजारांपेक्षा अधिक वीजजोडण्या देण्याचे नियोजन आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक पातळीवर कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्याची तातडीने कार्यवाही करावी. सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र तत्काळ बदलण्याची कार्यवाही करण्यात यावी तसेच नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी अतिरिक्त स्वरूपात रोहित्र तयार ठेवावेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aim to provide new power connections to agricultural pumps by march pune print news pam 03 amy