पुणे : ‘राज्यात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात ‘एमआयएम’च्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांत पक्षाची शहरातील ताकद दिसेल,’ असे पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘एमआयएम’चे उमेदवार अनीस सुंडके यांनी सांगितले. सुंडके यांच्या प्रचारासाठी ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची ७ मे रोजी पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. सभेचे ठिकाण अजून निश्चित करण्यात आलेले नाही.
सुंडके यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की विधानसभा, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासून काम सुरू केले आहे. पुणे शहरात ‘एमआयएम’चा एक आमदार आणि महापालिकेत ३० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांशी आतापासून संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा…शिरूरमध्ये सत्तेचा गैरवापर, कार्यकर्त्यांना नोटिसा; डॉ. अमोल कोल्हे यांचा आरोप
‘लोकसभा निवडणुकीत ओवेसी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली. मुस्लिम मतांचा वापर फक्त निवडणुकीसाठी केला जातो. मुस्लिम समाजातील प्रश्न, समस्या, शिक्षण, बेरोजगारी अशा मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा वापर फक्त राजकारणासाठी केला. मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे कायम दुर्लक्ष केले. काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेसने मला कामाची संधी दिली. नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करताना मी कायम जातधर्माच्या पलीकडे जाऊन काम केले. स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी जागा मंजूर करण्यात आली. भवानी पेठेतील रफी अहमद किडवाई शाळा बांधण्यात आली,’ असे सुंडके यांनी सांगितले.