पुणे शहरात येणाऱ्या पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या पुणे दर्शन सेवेसाठी तसेच माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी (आयटी) आवश्यक असणाऱ्या वातानुकूलित प्रवासी गाडय़ा खरेदी करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. पीएमपीच्या ताफ्यासाठी महापालिकेकडून अशा दहा गाडय़ा लवकरच दिल्या जाणार आहेत.
पुण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी पीएमपीतर्फे पुणे दर्शन बससेवा चालवली जाते. पुण्यातील विविध स्थळांची माहिती घेणाऱ्या पर्यटकांना शहरात दिवसभर फिरण्यासाठी चांगल्या दर्जाच्या आणि वातानुकूलित गाडय़ा दिल्या जाव्यात, यादृष्टीने गेली दोन वर्षे चर्चा सुरू होती. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी अशा गाडय़ांच्या खरेदीची कल्पना प्रथम मांडली होती आणि अशा गाडय़ांच्या खरेदीसाठी त्यांच्या अंदाजपत्रकात तरतूदही केली होती.
पुणे दर्शन सेवेबरोबरच आयटी उद्योगातील कर्मचारी आणि अधिकारी, अभियंते यांच्यासाठी देखील पीएमपीने वातानुकूलित बससेवा उपलब्ध करून द्यावी, असाही प्रस्ताव होता. त्यादृष्टीने आता दहा गाडय़ा खरेदीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, प्रतिगाडीची किंमत ६१ लाख २२ हजार ९४४ रुपये इतकी आहे. एकूण खरेदीसाठी सहा कोटी २२ लाख २९ हजार ४४० रुपये खर्च येणार आहे. या निविदेला मंजुरी द्यावी असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला असून समिती येत्या बैठकीत त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेईल. या खरेदीसाठी दोन निविदा आल्या होत्या. त्यातील मे. टाटा मोटर्स लि. यांची निविदा कमी किमतीची आल्यामुळे त्यांच्याबरोबर करार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Story img Loader