लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) प्रवाशांसाठी पुण्यदशम बस सुरू केल्या आहेत. प्रवाशांना दहा रुपयांत या वातानुकूलित बसमधून प्रवास करता येतो. प्रत्यक्षात या बसमधील वातानुकूलन यंत्रणा ऐन उन्हाळ्यात बंद आहे. कारण ही यंत्रणा सुरू केल्यास बस बंद पडत असल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हात झटकले असून, पीएमपी प्रशासनाने हतबलता व्यक्त केली आहे.
ऐन उन्हाळ्यात पुण्यदशम बसमधील वातानुकूलन (एसी) यंत्रणा बंद आहे. या बसमधील एसी कधीच सुरू नसतो, अशी तक्रार प्रवासी वारंवार करतात. याप्रकरणी पीएमपी प्रवासी मंचाचे मानद सचिव संजय शितोळे यांनी पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) तक्रार केली होती. पुण्यदशम बस एसी सुरू केल्यानंतर बंद पडत असून, अशा बस खरेदी करण्यास परवानगी कशी दिली, असा प्रश्न त्यांनी पीएमपीला विचारला होता. याप्रकरणी चौकशी करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
आणखी वाचा-पुण्यात उद्यापासून पाणीकपात; टँकरनेही पाणीपुरवठा होणार नाही
आरटीओने पुण्यदशम बसला एसी बस म्हणून कोणत्या निकषावर तंदुरुस्ती प्रमाणपत्र दिले, अशी विचारणाही शितोळे यांनी केली होती. एसी सुरू ठेवून या बस चालत नसल्याने त्या मोटार वाहन कायद्याचा भंग करून रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे या बसवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी शितोळे यांचे पत्र पीएमपीला पाठवून त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. हा मुद्दा आरटीओशी निगडित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकप्रकारे आरटीने हात झटकले आहेत.
आणखी वाचा- विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
इंजिन क्षमता कमी असल्याने समस्या
पीएमपीकडे सध्या ५० पुण्यदशम बस आहेत. या बसची इंजिन क्षमता ११० अश्वशक्ती आहे. एसी बसची इंजिन क्षमता किमान १३० अश्वशक्ती असावी लागते. याचबरोबर या बसची प्रवासी क्षमता २४ आहे. बसमध्ये प्रवाशांची संख्या नेहमीच जास्त असते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असताना एसी सुरू केल्यास बसच्या इंजिनवर ताण येऊन ती बंद पडते. त्यामुळे चालक एसी बंद करून बस चालवण्यास प्राधान्य देतात, अशी माहिती पीएमपीतील सूत्रांनी दिली.
पुण्यदशम बसच्या इंजिनची क्षमता एसीसाठी योग्य नाही. या बसला आरटीओ परवानगी कोणत्या निकषावर दिली. त्यांनी आता यावर हात झटकले आहेत. पीएमपीने अशा बस ताफ्यात का घेतल्या, असा प्रश्नही उपस्थित होतो. -संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच