पुणे : हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर या विमानाचा वापर प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती अथवा आपत्कालीन प्रसंगी मदत पुरवठा करण्यासाठी केला जातो. आता या विमानाचा वापर हवाई दलाने पुण्याहून दिल्लीला अवयव नेण्यासाठी केला आहे. यामुळे पुण्यातून यकृत आणि एक मूत्रपिंड दिल्लीत पोहोचून प्रत्यारोपण यशस्वीपणे होऊ शकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २४ वर्षीय महिलेला मेंदुमृत घोषित करण्यात आले होते. तिचे अवयव दान करण्यात आले. तिचे एक मूत्रपिंड लष्करी रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आले. याच वेळी दुसरे मूत्रपिंड आणि यकृत दिल्लीतील आर अँड आर लष्करी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले. हे अवयव दिल्लीला हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानातून दिल्लीला नेण्यात आले. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्यामुळे अवयव दिल्लीत वेळेत पोहोचून प्रत्यारोपण यशस्वी झाले.

आणखी वाचा-विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा! म्हणाले…

याबाबत विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले म्हणाल्या, की लष्करी रुग्णालयातील मेंदुमृत महिलेच्या अवयवांचे लष्कराकडून त्यांच्या पातळीवर वाटप करण्यात आले. लष्करी रुग्णालयात मेंदुमृत व्यक्ती घोषित करण्यास आल्याने प्रथम प्राधान्य लष्करी रुग्णालयातील रुग्णांना असते. त्यांच्याकडे प्रतीक्षा यादीतील रुग्ण उपलब्ध नसल्यास इतर रुग्णालयांतील रुग्णांचा विचार केला जातो. त्यामुळे पुण्यातील लष्करी रुग्णालयातील रुग्ण आणि दिल्लीतील आर अँड आर लष्करी रुग्णालयातील रुग्णांना हे अवयव देण्यात आले.

ग्लोबमास्टरचा आधी कशासाठी वापर?

नैसर्गिक आपत्तीवेळी मानवतावादी मदतीसाठी सी-१७ ग्लोबमास्टरचा वापर आधीपासून केला जातो. यागी चक्रीवादळामुळे व्हिएतनामला पुराचा मोठा फटका बसल्यानंतर त्या ठिकाणी मदत पोहोचविण्यासाठी या विमानाचा हवाई दलाने वापर केला होता. हवाई दलाच्या हिंडन तळावरूनच या मदत मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. या विमानातून ३५ टन मदत सामग्री त्या वेळी पाठविण्यात आली होती. त्यात जलशुद्धीकरण साहित्य, पाण्याचे कंटेनर, ब्लँकेट, स्वयंपाकाच्या वस्तू, सौरकंदील अशा वस्तू होत्या.

आणखी वाचा-परवडणाऱ्या घरांमध्ये पुणे देशात आघाडीवर! मागणी सर्वाधिक कुठे अन् किमती जाणून घ्या…

हिंडन येथील हवाई दलाच्या तळावरून ग्लोबमास्टर सी-१७ विमान दिल्लीतील आर अँड आर लष्करी रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला घेऊन पुण्याकडे झेपावले. यासाठी ग्रीन एअर कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. वेळेत अवयव दिल्लीत पोहोचल्याने प्रत्यारोपण यशस्वीरीत्या होऊ शकले. -हवाई दल

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air force c 17 globemaster used to transport organs from pune to delhi pune print news stj 05 mrj