पुणे: पुण्यावरून हैदराबाद येथे निघालेले वायुदलाचे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बारामती तालुक्यातील खांडज गावातील शेतात उतरविण्यात आले. हेलिकॉप्टर सुरक्षितपणे शेतात उतरल्याने कोणालाही इजा झाली नाही. आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आलेले हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
हेही वाचा >>>पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘रस्ता सुरक्षा अभियान’; महामार्गावर आरटीओ, पोलीस असणार २४ तास ऑन ड्युटी
खांडज गावाच्या शिवारात हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये भारतीय वायुदलाचे चेतक हे हेलिकॉप्टर उतरविण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दुरुस्ती झाल्यानंतर हेलिकॉप्टर सोलापूर येथे रवाना होणार असल्याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. उतरविण्यात आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तीन पुरुष आणि एक महिला प्रवासी प्रवास करत होते. आपत्कालीन स्थितीत हेलिकॉप्टर उतरविण्यात आल्यानंतर कोणालाही कसलीही इजा झाली नाही. अचानकपणे हेलिकॉप्टर उतरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे घटनास्थळी माळेगाव पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला.
हेलिकॉप्टर नेमके कशामुळे उतरले आहे, याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे याबाबत अफवा पसरल्या होत्या. मात्र, काही वेळातच स्थिती स्पष्ट झाली. पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. वायुदलाचे अधिकारीही या ठिकाणी पोचले.