पिंपरी: अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषण कमालीचे घटले आहे. धुलिकणांचे प्रमाण ५० च्या दरम्यान आले आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. धुलिकणांचे प्रमाण वाढते. गेल्या काही दिवसात शहरातील प्रदूषणात मोठी वाढ झाली होती. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. दिवाळीत नागरिकांनी जोरदार फटके फोडले. फटाक्यांच्या प्रदूषणाची भर पडली. दिवाळीत फटाके आणि निर्माणाधीन गृहप्रकल्पामुळे शहरातील निगडी, भोसरी, वाकड मधील भूमकर चौकातील हवेची गुणवत्ता अतिवाईट श्रेणीमध्ये गेली होती. हवा गुणवता निर्देशांकात धुलिकणांचे प्रमाण ३८० च्या पलीकडे गेले होते.

हेही वाचा… पुण्यात यंदा लोकसभेला मतदानाचा टक्का वाढणार? पुण्यात दोन दिवसांत ११ हजार जणांची मतदार नोंदणी

दिल्लीनंतर पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागातील हवा प्रदूषित झाली हाेती. त्यामुळे शहरात सुरू असलेली बांधकामे सात दिवस बंद ठेवली होती. हवेची गुणवत्ता सुधारल्याने २० नोव्हेंबरपासून बांधकामे पुन्हा सुरू करण्यात आली होती. त्यानंतरही शहरातील भूमकर चाैक, निगडी, भाेसरी या भागातील हवेची गुणवत्ता (एक्यूआय) १०० ते १२५ हाेता. मात्र, अवकाळी पावसाने शहर आणि परिसराला चांगलेच झाेडपले. धुकेही मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील हवेची गुणवत्ता ५० पर्यंत खाली आली आहे. परिणामी, प्रदूषणात मोठी घट झाली आहे.

पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, की शहरातील विविध भागातील धुलिकणांचे प्रमाण ५० च्या दरम्यान आले आहे. त्यामुळे प्रदूषणात घट झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution in pimpri chinchwad city has reduced due to unseasonal rain and fog pune print news ggy 03 dvr
Show comments