पुणे : लक्ष्मीपूजनानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने शहर आणि उपनगरातील हवा बिघडली. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक शंभरी ओलांडून ११५वर पोहोचला. शनिवारी हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याचा अंदाज आहे. पावसाच्या काळात हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र, पावसाळा सरल्यानंतर धूलिकणांचे हवेतील प्रमाण वाढते. त्याशिवाय फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही हवेची गुणवत्ता खालावते. हवेच्या गुणवत्ता निकषानुसार ५०पर्यंत निर्देशांक असल्यास हवेची गुणवत्ता निर्धोक मानली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?

समाधानकारक स्तरात ५१ ते १००पर्यंत निर्देशांक असल्यास हवेतील काही प्रदूषणकारी घटक त्रासदायक ठरू शकतात. साधारण स्तरात १०१ ते २०० दरम्यान निर्देशांक असल्यास मुले आणि ज्येष्ठांना श्वसनासाठी त्रास होतो. वाईट स्तरात २०१ ते ३०० या दरम्यान निर्देशांक असल्यास सर्वांवरच त्याचा विपरीत परिणाम होतो. अतिवाईट स्तरात ३००पेक्षा जास्त निर्देशांक असल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा >>> सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जगण्याचा संघर्ष अखेर यशस्वी!

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासून फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही आतषबाजी करण्यात आली. मोठ्या माळा, आवाजी फटाक्यांसह शोभेच्या फटाक्यांचे प्रमाण जास्त होते. फटाक्यांमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या आतषबाजीमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत समाधानकारक असलेली हवेची गुणवत्ता सायंकाळपासून खालावू लागली. त्यानुसार हवा गुणवत्ता निर्देशांक कात्रज येथे १७५, भूमकरनगर येथे १५८, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे १३७, शिवाजीनगर येथे १११ नोंदवला गेला. या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खालावल्याचा परिणाम शनिवारीही कायम राहण्याचा अंदाज सफर प्रणालीद्वारे वर्तवण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air quality deteriorated in pune city due to diwali firecracker pune print news ccp 14 zws