आंतरराष्ट्रीय निकषांनुसार एअर रायफल आणि एअर पिस्तूलची ‘शूटिंग रेंज’

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता ‘फायरिंग’चा आवाज घुमणार आहे. विद्यापीठात साकारत असलेल्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय निकषांनुसार नेमबाजीसाठीची १० मीटर एअर रायफल आणि एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारांसाठीची शूटिंग रेंज उभारली जात असून, विद्यापीठात शूटिंग रेंज असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यातील बहुधा पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे.

विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या क्रीडा संकुलातील फुटबॉल मैदान आणि अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर बहुउद्देशीय सभागृहाचे काम सध्या सुरू आहे. या बहुउद्देशीय सभागृहात इनडोअर खेळांची सुविधा उपलब्ध असेल. त्यात टेबल टेनिस, बॅडमिंटनपासून कुस्ती, कबड्डी अशा विविध खेळांचा त्यात समावेश आहे. अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवरही विविध खेळांचा सराव करता येऊ शकतो. मात्र, विद्यापीठातील शूटिंग रेंज वेगळी ठरणार आहे. आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धासारख्या विविध स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महाविद्यालयीन खेळाडूंना या निमित्ताने सरावासाठी हक्काची शूटिंग रेंज उपलब्ध होईल. या क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये उद्घाटन करण्याचे नियोजन आहे.

‘विद्यापीठ स्तरावर किंवा अन्य स्पर्धामध्येही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली होते. मात्र, नेमबाजीसाठी विद्यार्थ्यांना बाहेरच्या शूटिंग रेंजचा आधार घ्यावा लागतो. शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर सरावासाठी मर्यादाही येतात. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी शूटिंग रेंज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शूटिंग रेंजमुळे सराव करण्यासह नवे नेमबाज घडवता येतील. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या निकषांनुसारच ही शूटिंग रेंज साकारत आहे. या शूटिंग रेंजवर एकूण २४ टार्गेट्स असतील. शूटिंग रेंज आणि अत्याधुनिक व्यायामशाळा मिळून तीन ते चार कोटींचा खर्च करण्यात येत आहे,’ अशी माहिती विद्यापीठ क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

वाढत्या शूटिंग रेंज..

गेल्या काही वर्षांत पुण्यात नेमबाजीच्या सरावासाठी शूटिंग रेज तयार झाल्या आहेत. त्यात स. प. महाविद्यालय, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे महानगरपालिका यांच्यासह नेमबाज गगन नारंग यांच्या गन फॉर ग्लोरीसारख्या काही खासगी शूटिंग रेंजही पुण्यात आहेत. उपलब्ध असलेल्या शूटिंग रेंजची संख्या जवळपास सहा ते दहा आहे. त्यामुळे नेमबाजीविषयीचे आकर्षण निर्माण होत असल्याचे दिसून येते.

धोरण ठरवणार

विद्यापीठातील शूटिंग रेंजवर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. मात्र, अन्य नेमबाजांनाही सरावासाठी रेंज उपलब्ध करून देता येऊ शकेल. मात्र, त्याबाबतीत, धोरण ठरवून निर्णय घेतला जाईल.

विद्यापीठात शूटिंग रेंज होणे ही चांगलीच गोष्ट आहे. विद्यापीठातील नेमबाजांना सरावासाठी करावी लागणारी दगदग बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काही विद्यार्थ्यांना नेमबाजी केवळ छंद म्हणून जपता येऊ शकेल. नेमबाजीमध्ये एकाग्रता खूप महत्त्वाची असल्याने त्याचा त्यांना अभ्यासासाठीही उपयोग होऊ शकतो. गेल्याकाही काळात युवा खेळाडू मोठय़ा प्रमाणात नेमबाजीकडे वळले आहेत. त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा विकसित होणे हे स्वागतार्हच आहे.

– अंजली वेदपाठक, माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज