पुणे : कोंढव्यातील साळुंखे विहार परिसरात एका घरावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. बिलाल शेख (वय २९, रा. रोशमा रेजन्सी, साळुंखे विहार) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोढवा पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंखे विहार परिसरात एका घरावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला शनिवारी दुपारी मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक रऊफ शेख आणि पथकाने तेथे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा स्वयंपाकघरातील खिडकीच्या काचेवर खड्डा पडल्याचे दिसून आले. ज्या घरावर गोळी झाडण्यात आली होती. तेथे छऱ्याचे तुकडे आढळून आले.
घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तेव्हा समोरच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकेतून गोळीबार करण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा बिलाल शेखने छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शेख याला बंदुकीसह ताब्यात घेतले.