पुणे : दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे पर्यटक भयभीत झाले असून, त्यांचे माघारी येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विमान कंपन्या नियोजित प्रवासी शुल्कावर अडून आहेत. ही नफा कमाविण्याची वेळ नसून, माणुसकी दाखविण्याची वेळ आहे. सरकारने पर्यटकांना सुरक्षित माघारी आणण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

‘दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला म्हणजे देशाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर घटना आहे. गुप्तचर यंत्रणांना या घटनेबाबत माहिती होती किंवा नव्हती, याबाबत अद्याप कुठलीच ठोस माहिती मिळालेली नाही. सद्य:स्थितीला आरोप-प्रत्यारोपात न पडता, टीका-टिप्पणी न करता काश्मीरमधील नागरिकांना सुरक्षा देण्याची गरज आहे. देश-परदेशातील पर्यटकांना सुरक्षित आणि तातडीने माघारी आणण्यासाठीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत,’ असे खासदार सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘ही राजकारण करण्याची वेळ नाही. या हल्ल्यामुळे देशातील नागरिक भयभीत झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंंत्री अमित शहा यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून भूमिका स्पष्ट करावी. तसेच, काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांची सुरक्षितता निश्चित करून त्यांना सुखरूप माघारी पाठविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी,’ असे सुळे म्हणाल्या.

‘सद्य:स्थितीत काश्मीरमधील पर्यटक माघारी सुखरूप पोहोचविणे ही सरकारमधील प्रत्येक पक्षाची नैतिक जबाबदारी आहे. सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर संघटनांचे अपयश आहे किंवा नाही, याबाबत गृहमंत्रालयाकडून माहिती समोर आल्यानंतर सरकारला याबाबत विचारणा करण्यात येईल,’ असे सुळे यांनी सांगितले.