पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित मूळ जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला नागरी हवाई वाहतूक संचालनालयानेही (डीजीसीए) मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता भूसंपादनाला गती देईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिली. लोहगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार गरजेचा असून नवी मुंबई विमानतळ मार्च २०२५ पर्यंत कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात मोहोळ बोलत होते. संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> एमएचटी-सीईटीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार…जाहीर झाली तारीख आणि वेळ…
मोहोळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने या विमानतळासाठी पुरंदरमधील जागा निश्चित केली होती. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) या प्रस्तावाला केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने मान्यता दिली. दरम्यान, यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने एमएडीसीमार्फत नव्या जागेवर विमानतळाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले. या सरकारने मूळ जागेवरच विमानतळाचा प्रस्ताव नव्याने केंद्राकडे पाठविला. या जागेला संरक्षण मंत्रालयाच्या पाठोपाठ १५ जून रोजी डीजीसीएनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासनामार्फत भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती दिली जाईल, अशी खात्री आहे, असे ते म्हणाले.
सहकाराला बळकटी देत आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशातून लवकरच नवे राष्ट्रीय सहकार धोरण निश्चित करण्यात येणार आहे. वैकुंठ मेहता सहकारी संस्थेमध्ये सहकार विद्यापीठ साकारण्याच्या प्रस्तावाला चालना देण्यात येईल. अमित शहा यांच्यासारख्या ‘कडक हेडमास्तर’ बरोबर काम करताना खूप काही शिकण्याची संधी मिळेल. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री